मनपाकडून कुत्र्यांची माहिती घेण्यास सुरुवात
शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदींना फॉर्मचे वितरण : केवळ कन्नड भाषेतील फॉर्ममुळे गोंधळ
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वोच्च न्यायालयाने शाळा, रुग्णालये, बसस्थानक, रेल्वेस्थानक, शैक्षणिक संस्थांच्या आवारातून भटक्या कुत्र्यांना हटविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेकडून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून संबंधितांना विहित नमुन्यातील फॉर्म दिला जात असून त्यामध्ये आपल्या परिसरात वावरणाऱ्या कुत्र्यांची संख्या प्रभाग क्रमांक व इतर माहिती मागविली आहे. पण सदर फॉर्म केवळ कान्नड भाषेतून दिला जात असल्याने अन्य भाषिकांना समजणे कठीण जात आहे. त्यामुळे इंग्रजी व मराठीतूनही फॉर्म उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
राज्यासह देशभरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कुत्र्यांचे झपाट्याने होणारे प्रजनन हे त्याला मुख्य कारणीभूत असून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून व्यवस्थितरित्या निर्बिजीकरण व त्यांचे लसीकरण देखील होत नसल्याचा आरोप आहे. कुत्र्यांचे नागरिकांवर वाढत चालले हल्ले लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मंदिर, मशीद अशा सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या कुत्र्यांची माहिती गोळा करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. तसेच एबीसी कायदा 2023 नुसार पकडलेल्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवावे, इतकेच नव्हे तर त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करावे. ज्या ठिकाणाहून कुत्री पकडण्यात येतात. पुन्हा त्याच ठिकाणी ती सोडण्यात येऊ नयेत.
तीन ठिकाणी फिड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव
बेळगाव महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांसाठी शहर व उपनगरात तीन ठिकाणी फिड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त शुभा बी. यांनी शहरातील प्राणीदया संघटना व सेवाभावी संघटनांना बोलावून बैठक घेत चर्चा केली होती. त्यानुसार कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी फिड सेंटर सुरू करण्यासाठी जागा निश्चित करण्याची सूचना केली होती. पण अद्यापही जागा निश्चित झालेली नाही. एकलाख लोकसंख्येच्या मागे कुत्र्यांसाठी एक शेल्टर असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत आहे. पण बेळगाव शहरातील परिस्थिती पाहता अत्यंत चिंताजनक बनली आहे. कारण कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. महापालिकेला ठेकेदार मिळणे अवघड झाले असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. यापूर्वी कुत्र्यांचे निर्बिजीकरण श्रीनगर येथील गो शाळेत केले जात होते. पण त्याठिकाणी निर्बिजीकरण करण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे हिरेबागेवाडी येथील महानगरपालिकेच्या जागेवर कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसात शेल्टरचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर पकडलेल्या कुत्र्यांची सदर शेल्टरमध्ये रवानगी केली जाणार आहे.
तिन्ही भाषेतील फॉर्म उपलब्ध करून द्यावे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार महानगरपालिकेकडून शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मंदिर, मशीद आदी ठिकाणी वावर असलेल्या कुत्र्यांची संख्या जाणून घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून विहित नमुन्यांचे अर्ज देऊन त्याद्वारे माहिती मागविली जात आहे. त्याचबरोबर कुत्र्यांची गणतीदेखील केली जाणार आहे. पण सध्या केवळ महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून फॉर्मद्वारे कुत्र्यांच्या संख्येबाबत माहिती जाणून घेतली जात आहे. बेळगाव शहरात मराठी, कानडी त्याचबरोबर इतर भाषिक मोठ्या संख्येने आहेत. पण महापालिकेकडून केवळ कानडी भाषेतील फॉर्म दिला जात आहे. त्यामुळे अन्य भाषिकांना समजणे कठीण जात आहे. महापालिकेने याकडे लक्ष घालून तिन्ही भाषेतील फॉर्म उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.