थकबाकी दुकानगाळ्यांना मनपाने ठोकले सील
35 लाखांच्या थकबाकीमुळे केपीटीसीएल रोडवर कारवाई, साहित्य जप्त
बेळगाव : महापालिकेने थकबाकीदार दुकानगाळे, तसेच अतिक्रमणावर बुधवारी मोठी कारवाई केली. केपीटीसीएल रोडवरील अतिक्रमण हटविण्यासोबतच भाडे न भरलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. तीन दुकानांना सील ठोकण्यात आले. तर अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा देण्यात आल्याने या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे थकबाकीदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. केपीटीसीएल रोडवर स्मार्ट सिटीअंतर्गत दुकानगाळे उभारले आहेत. 14 पैकी 7 दुकानगाळ्यांचे भाडे थकले आहे. अनेकवेळा सूचना करूनही भाडे भरलेले नाही. तब्बल 35 लाख रुपयांचे भाडे थकीत असल्याने बुधवारी सकाळपासून आरोग्य व महसूल विभागाने संयुक्तरित्या कारवाई केली. अनेकवेळा सूचना करूनही भाडे न भरलेल्या तीन दुकानांना सील ठोकण्यात आले. महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. महापालिकेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याची माहिती मनपा आयुक्तांना मिळाली होती. मनपा आयुक्त शुभा बी. यांनी कारवाईचे आदेश देताच बुधवारी केपीटीसीएल रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले. मुख्य गाळेधारकांनी आजूबाजूच्या जागेमध्ये अतिक्रमण करत तेथे अतिरिक्त भाडेकरू ठेवल्याचे दिसून आल्याने अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. स्टॉलचे साहित्य जप्त करण्यात आले. दुपारपर्यंत ही कारवाई सुरू होती.
आजवर निव्वळ डोळेझाक...
केपीटीसीएल रोडवरील 14 पैकी 13 गाळेधारकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. अतिक्रमण करून दोन वर्षे होत आली तरी यापूर्वी त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे मागील दोन वर्षांत एकाही अधिकाऱ्याला हे अतिक्रमण दिसले नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही गाळेधारकांनी एकाच गाळ्याचे दोन गाळे तयार करून ते भाड्याने दिले आहेत. तर काहींनी खुल्या जागेत लोखंडी कमान उभारून कॅफे तयार केला आहे. त्यामुळे आतापर्यंत अतिक्रमणावर का कारवाई झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.