कणबर्गी तलावातील कचऱ्याची मनपाकडून उचल
‘तरुण भारत’ वृत्ताची दखल : परिसर स्वच्छ झाल्याने ग्रामस्थांतून समाधान
बेळगाव : कणबर्गी येथील कुंभार तलाव परिसरात कचरा टाकण्यात येत असल्याने गलिच्छ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे याबाबत ‘तरुण भारत’ने बातमी प्रसिद्ध करताच याची दखल घेत महापालिकेच्यावतीने कचऱ्याची उचल करण्यात आली आहे. परिणामी तलाव परिसर स्वच्छ झाला असून, याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र कचरा टाकणाऱ्यांनादेखील महापालिकेने समज द्यावी, अशी मागणी केली जात आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या शहर व उपनगरातील विविध ठिकाणी कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
पण कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कणबर्गी गावातील कुंभार तलाव परिसर हा निसर्गरम्य आहे. मात्र अलीकडे काही जणांकडून तलाव परिसरात केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. कचरा टाकण्यात येत असल्याने गलिच्छ वातावरण निर्माण होण्यासह परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते. घरोघरी जाऊन घंटागाडी कचऱ्याची उचल करते मात्र काहीजण घंटागाडीकडे कचरा देण्याऐवजी तलाव परिसरात कचरा टाकून देत आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडूनही कचऱ्याची उचल होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
घंटागाडीकडे कचरा देण्यासंदर्भात रहिवाशांना सूचना द्या
याबाबत ‘तरुण भारत’मधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेकडून तलाव परिसरातील कचऱ्याची उचल करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे. ही समस्या कायमस्वरुपी मार्गी लागावी यासाठी उघड्यावर कचरा टाकण्याऐवजी घंटागाडीकडे कचरा देण्यासंदर्भात तेथील रहिवाशांना सूचना करण्यात यावी, किंवा त्याठिकाणी कचरा कुंडी ठेवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.