अनगोळ रोडवरील ब्लॅकस्पॉट महापालिकेने हटविला
कचऱ्याची उचल करून केली फुलांची सजावट
बेळगाव : शहर स्वच्छतेचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यात आला असला तरीही शहरातील कचऱ्याची समस्या मात्र दूर होताना दिसत नाही. त्यामुळे जिकडे तिकडे निर्माण झालेले ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. रविवारी अनगोळ मुख्य रस्त्यावरील हरि मंदिरजवळ असलेला ब्लॅकस्पॉट हटविण्यात आला असून त्या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर बेळगाव निर्माण करण्यासाठी स्मार्टसिटी व महापालिकेकडून कंबर कसण्यात आली आहे. मात्र, अद्यापही यश आलेले नाही. शहरातील कचऱ्याची व्यवस्थितरीत्या उचल व विल्हेवाट होत नसल्याने नुकतेच महापालिकेकडून 1 ऑगस्टपासून शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील कंपनीला देण्यात आला आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेची घंटागाडी घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करीत होती.
मात्र आता गेल्या काही दिवसांपासून घरोघरी जाऊन कचऱ्याची व्यवस्थितरीत्या उचल करण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घंटागाडी वेळेत येत नसल्याने नागरिक जागा मिळेल, त्या ठिकाणी कचरा टाकून देत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ब्लॅकस्पॉट वाढत चालले आहेत. शहराच्या दक्षिण भागात भूमिगत डस्टबिन बसविण्यात आले आहेत. डस्टबिनमध्ये कचरा टाकण्याऐवजी नागरिक डस्टबिन बाहेर वाहनावरून जाता जाता कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग तसेच पडल्याचे दिसून येत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शहराच्या स्वच्छतेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. पण कचऱ्याची समस्या मार्गी लागणे कठीण झाले आहे. अनगोळ मुख्य रोडवरील हरि मंदिरजवळ ब्लॅकस्पॉट तयार झाला होता. त्यामुळे तो हटविण्यासाठी महापालिकेकडून तेथे स्वच्छता करण्यात आली असून कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा फेकून देण्याऐवजी तो घंटागाडीकडे द्यावा, असे आवाहन केले जात आहे.