मनपाची 9 लाखांची घरफाळा वसुली
कोल्हापूर :
घरफाळा विभागाच्या वतीने थकीत घरफाळा प्रकरणी धडक कारवाई सुरु केली आहे. गुरुवारी घरफाळा विभागाच्या वतीने राजारामपुरीतील राजारामपुरी, रेल्वे फाटक, उद्यमनगर येथील थकीत रक्कम व चालु देयके मिळून 9 लाख 71 हजार रुपये वसुल केले. तर उद्यमनगर येथील कारखाना सिल करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा विभागाच्या वतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना जप्ती नोटीस लागु केल्या आहेत. यामधील ज्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही अशा थकबाकीदारांवर कारवाई करुन मिळकती सिल करणेची कार्यवाही सुरु केली आहे. राजारामपुरी विभागाअंतर्गत मालमत्ता कर थकीत रक्कमेचे अनुषंगाने राजारामपुरीतील राजारामपुरी, रेल्वे फाटक, उद्यमनगर येथील थकीत रक्कम व चालु देयके मिळून 9 लाख 71 हजार 420 वसूल करण्यात आले. यामध्ये उद्यमनगर येथील शाम फेब्रीकेटर यांचे कारखान्याचे 11 लाख थकीत रक्कमेपोटी मिळकत सील करण्यासाठी वारंट बजावण्यात आला होता. परंतु त्यांना मुदत देवूनही कराची उर्वरित थकीत रक्कम न भरल्याने सदरचा कारखाना सील करण्याची कार्यवाही घरफाळा विभागाने आज चालू केली. यावेळी उद्यमनगर येथील शाम फेब्रीकेटर यांनी उर्वरित थकीत रक्कम 5 लाख 32,हजार रुपये भरणा केली. तसेच राजारामपुरी येथील संभाजी पाटील यांची 1 लाख 11 हजार थकीत रक्कम व रेल्वे फाटक येथील करदात्याकडून 3 लाख 28 रुपयांची रक्कम जमा केली.