तळबीड पोलिसांकडून 10 लाखांचा गुटखा जप्त
उंब्रज :
कर्नाटक राज्यातून आणलेला सुमारे 10 लाख 30 हजार रूपयांचा गुटखा तासवडे टोलनाका येथे बोलेरो पिकअप टेम्पोसह तळबीड (ता. कराड) पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार 21 रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातील निपाणी येथून एक पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप टेम्पो गुटखा वाहतूक करणार असल्याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तासवडे टोलनाका येथे नाकाबंदी लावून तपासणी करण्याचे आदेश दिले होते. रात्री साडे अकराच्या सुमारास बोलेरो पिकअप हौदा टेम्पो आल्यावर तो थांबवून चौकशी केली. त्यावेळी चालकाने विकास वसंत जाधव (वय 35, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) असे नाव सांगितले. गाडीत गुटखा ठेवलेली पोती आढळली. गुटख्याचा व गाडीचा सविस्तर पंचनामा केला असून एकूण 10 लाख 30 हजार रूपये किमतीचा गुटखा जप्त केला असून टेम्पो व प्लास्टिकच्या क्रेटसहित एकूण 15 लाख 41 हजार 30 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. विकास जाधव याच्यावर तळबीड पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, चालक मोरे, खराडे, हवालदार साळुंखे, शहाजी पाटील, सुशांत कुंभार, प्रवीण गायकवाड, अभय मोरे, गणेश राठोड, निलेश विभूते, रत्ना कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित विकास जाधव यास 26 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.