For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सव-विसर्जनासाठी महापालिका सज्ज

02:57 PM Aug 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सव विसर्जनासाठी महापालिका सज्ज
Advertisement

24 क्रेनची व्यवस्था : 11 फिरत्या विसर्जन वाहनांची व्यवस्था : 84 लाख 80 हजार रुपयांचा निधी करणार खर्च

Advertisement

बेळगाव : आजपासून सुरू होणाऱ्या बेळगावातील ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्यावतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डे, पथदीप, मोबाईल टॉयलेट, गॅलरीसह सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन केले जाणारे तलाव, क्रेन आणि फिरते विसर्जन तलाव तयार ठेवण्यात आले आहेत. यासाठी सुमारे 84 लाख 80 हजार रुपये महापालिकेकडून खर्च केले जाणार आहेत.

सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार शहरात 380 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आहेत. बहुतांश मंडळे अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशीदिवशी श्री मूर्तींचे विसर्जन करतात. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील काही मंडळेही गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी शहराकडे येत आहेत. विसर्जन काळात कोणत्याही प्रकारची गौरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकडेकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना व तयारी करण्यात आली आहे.

Advertisement

महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या नऊ विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यासह रंगरंगोटी करून त्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या कामासाठी महापालिकेकडून 66 लाख 80 हजार रुपयांचा ठेका संबंधीत ठेकेदाराला देण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणच्या तलावांची स्वच्छता व रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. तर काही तलावांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मोठ्या श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी तलावांवर क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 24 क्रेन तैनात करण्यात येणार असून यासाठी 18 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणेश विसर्जन करण्यासाठी महापालिकेकडून शहरात 11 फिरत्या वाहनांची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

6 सप्टेंबर अनंत चतुर्दशीदिवशी सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तसेच सातव्या व नवव्या दिवशीही श्री गणेश मूर्तींचे काही ठिकाणी विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर सातव्या दिवशी किल्ला तलाव आणि कणबर्गी तलावावर प्रत्येकी 2 क्रेन, नवव्या दिवशी किल्ला, कणबर्गी आणि जक्केरी होंडा येथे प्रत्येकी एक, कपिलेश्वर नवीन तलाव येथे 5 कपिलेश्वर जुन्या तलावावर 4, जक्केरी होंडा येथे 4, कपिलेश्वर तलाव जुने बेळगाव येथे 2, अनगोळ लाल तलाव, ब्रह्मदेव मंदिर मजगाव, किल्ला तलाव, कणबर्गी नवीन तलाव येथे प्रत्येकी 1 अशा एकूण 24 क्रेन विसर्जनासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

या ठिकाणी होणार श्रीमूर्तींचे विसर्जन

  • जुना कपिलेश्वर तलाव
  • नवीन कपिलेश्वर तलाव
  • जक्केरी होंडा
  • अनगोळ लाल तलाव
  • कपिलेश्वर तलाव जुने बेळगाव
  • ब्रह्मदेव मंदिर मजगाव
  • किल्ला तलाव
  • कणबर्गी तलाव
  • नाजर कॅम्प वडगाव
Advertisement
Tags :

.