महापालिकेची ‘ईइएसएल’ कंपनीला नोटीस
चार दिवसांची डेडलाईन : एलईडी दिवांच्या मेंटनन्स बंद केल्यावरून कारवाई : शहरातील 800 दिवे बंद
कोल्हापूर / विनोद सावंत :
महापालिकेने शहरातील एलईडी दिवे बसविणे-दुरूस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या ईइएसएल कंपनीला नोटीस बजावली आहे. शहरातील 700 ते 800 एलईडी दिवे सध्या बंद आहेत. साहित्यच मिळाले नसल्याने कंपनीने मेंटनन्स बंद केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. मनपाने दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कंपनीला चार दिवसांची डेडलाईन दिली आहे.
शहरात यापूर्वी रस्त्यावरील विद्युत खांबावरील दिवे सोडियमचे होते. यामुळे वीज बील जास्त येत होतेच शिवाय पर्यावरणावरही परिणाम करत होते. यामुळे एलईडी दिवे बसविण्यास प्राधान्य देण्यात आले. केंद्र शासनाने देशातील महापालिका क्षेत्रात एलईडी बसविण्याचा उपक्रम हाती घेतला. महाराष्ट्रामधील आठ महापालिका क्षेत्रात ईइएसएल (एनर्जी एफिसीएन्सी सर्विसेस लिमीटेड) कंपनीला या कामाचा ठेका दिला आहे. वीज बीलाची जेवढी बचत होणार त्याच्या निम्मी रक्कम संबंधित कंपनीला महापालिनकेने देणे असा करार या द्वारे करण्यात आला. कोल्हापूर महापालिकेत या प्रस्तावावरून गदारोळ झाला होता. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने या प्रकल्पाला कडाकडून विरोध केला होता. परंतू केंद्र शासनानेचे संबंधित कंपनीलाच काम देण्याचे सक्ती केल्याने विरोध होऊनही शहरात हा प्रकल्प सुरू झाला. 26 हजार एलईडी बसविण्याचे ठरले होते. परंतू 33 हजार दिवे बसवावे लागले. वास्तविक या प्रकल्पामुळे वीज बील कमी होईल असा दावा केला होता. परंतू अपेक्षित वीज बील कमी झालेले नाही. या उलट एलईडी सुरू राहण्या ऐवजी बंदच जास्तवेळा राहत आहेत.
कोल्हापूर महापालिकेमध्ये 2020 पासून ‘ईइएसएल‘ कंपनीची नियुक्ती झाली आहे. कराराप्रमाणे सात वर्षांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंपनीवर आहे. परंतू गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीने देखभाल दुरूस्तीकडे पाठ फिरवली आहे. कोल्हापुरातील कंपनीच्या संबंधिताच विचारणा केली असता राज्यातील मनपाकडून बील जमा झाले नसल्याने मेंटनन्ससाठी लागणारे साहित्य मिळत नसल्याने काम थांबवल्याचे सांगण्यात आले आहे. कोल्हापुरातही हीच स्थिती आहे. परिणामी कोल्हापुरातील 700 ते 800 एलईडी दिवे बंद आहेत. नागरिकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. वारंवार कंपनीला दुरूस्ती करण्याबाबत सांगूनही कार्यवाही झाली नसल्याने अखेर महापालिकेने दोन दिवसांपूवी कंपनीला नोटीस बजावली आहे.
चार दिवसांत दुरूस्ती काम सूरू झाले नाही तर कारवाई केली जाईल, असे यामध्ये म्हटले आहे. परंतू केवळ नोटीस देऊन समस्या सुटणार नाही. कंपनी जोपर्यंत मेटनन्स पूर्ववत सुरू करत नाही. तोपर्यंत मनपाने यंत्रणा लावून एलईडी सुरू करणे आवश्यक आहे. परंतू कंपनीला ठेका दिला असल्याने दुरूस्ती-देखभाल करू शकत नसल्याचा दावा मनपा करत आहे.
सहा महिन्यांपासून 400 तक्रारी रखडल्या
सहा महिन्यात मनपाच्या टोल फ्री सर्व्हींसवर 400 तक्रारी एलईडी बंद असल्याच्या आल्या असून त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
अन्यथा कंपनीला दंड सुरू करणार
ईइएसएल कंपनीने राज्यभरातील मेटनन्सची कामे थांबवली आहेत. कोल्हापूर शहरातील काम थांबविल्याने महापालिकेने एप्रिल 2024 पासून कंपनीचे बील देणे बंद केले आहे. तसेच चार दिवसांत मेटनन्स सुरू करा अन्यथा दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल, अशी नोटीसही बजावली आहे.
नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका
एलईडी दिव्यांचा ठेका- ईइएसएल कंपनी
ठेका दिलेली तारीख -2020
कंपनीची ठेक्याची मुदत -2027
मनपाकडून कंपनीला देणे-3 कोटी 50 लाख
शहरात बसविलेल्या एलईडीची संख्या -33 हजार
सध्या बंद असणारे एलईडी -800
नागरिकांच्या पेंडींग तक्रारी -400