शहापूर, खासबाग येथील समस्यांची मनपाकडून पाहणी
तातडीने गटारींची सफाई करण्याची अधिकाऱ्यांना सूचना, बसवेश्वर सर्कल नाल्यावर घालणार जाळी
बेळगाव : कोनवाळ गल्ली नाला आणि महात्मा फुले रोडवरील गटारींची पाहणी केल्यानंतर बुधवारी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी व मनपा अधिकाऱ्यांनी बसवेश्वर सर्कल येथील नाला आणि नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारीच्या समस्येची पाहणी केली. गटार ठिकठिकाणी तुंबली असल्याने तातडीने स्वच्छतेचे काम सुरू करण्यात यावे, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नाला आणि गटारींच्या समस्या मांडल्या होत्या. अनेकवेळा तक्रार करून देखील अधिकाऱ्यांकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्यांची सफाई करण्यात यावी. पावसाचे पाणी वाहून जाण्यास केरकचऱ्यामुळे अडथळे निर्माण होत असल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे शहरातील कच्च्या व पक्क्या नाल्यांची सफाई करण्याबरोबरच तातडीने गटारींचीदेखील सफाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
नगरसेवक रवी साळुंखे यांनी देखील आपल्या प्रभागात येणाऱ्या बसवेश्वर सर्कल येथील नाला आणि नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार बुधवारी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी स्वत: भेट देऊन नाला व गटारींची पाहणी केली. बसवेश्वर सर्कल येथील नाल्यावर जाळी बसविण्याची सूचना अधिकाऱ्यांना महापौरांनी केली. महात्मा फुले रोड आणि नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारींचा प्रश्न एकच स्वरुपाचा असल्याने वेगळ्या पद्धतीने गटारींची सफाई केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर सदर सफाई कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली. नगरसेवक रवी साळुंखे यांनी गेल्या दोन वर्षांपासून याकामी मनपाकडे पाठपुरावा चालविला होता. त्याला यश आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.