मनपाकडून तीन आपत्कालीन पथकांची स्थापना
विविध ठिकाणी झाडांची पडझड : नाले-गटारी-ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार : मनपा आयुक्त स्वत: फिल्डवर
बेळगाव : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली आहे. विविध ठिकाणी झाडे कोसळण्यासह नाले, गटारी आणि ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून काही ठिकाणच्या कचऱ्याची उचल झाली नसल्याने पावसाच्या पाण्याबरोबर कचराही वाहून येत असल्याने शहर व उपनगरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शुभा बी. स्वत: अधिकाऱ्यांसमवेत शहरात फेरफटका मारून समस्यांची पाहणी करत आहेत. आपत्कालीनकाळात नागरिकांना मदत मिळावी, यासाठी तीन पथकांची स्थापना केली आहे.
सोमवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे करून ती हटविण्यात यावीत, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. महापौर मंगेश पवार यांनी पुढाकार घेत वनखाते, हेस्कॉम, फलोत्पादन खाते व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त सर्व्हे केला होता. झाडे हटविण्यासाठी 10 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. खरेतर यावर तातडीने कार्यवाही होऊन झाडे हटविणे गरजेचे होते. पण सर्व्हे करण्याव्यतिरिक्त प्रत्यक्षात झाडे हटविली नाहीत. त्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने झाडांची पडझड सुरू झाली आहे.
काही ठिकाणी तुंबलेल्या ड्रेनेजदेखील कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केल्या. दरवर्षी मराठा कॉलनी, नानावाडी रोड, धामणे रोड, अंबाभुवन, एस. व्ही. कॉलनी आदी ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे त्या ठिकाणी मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झालेल्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पाणी वाहून जाण्यास मार्ग करून देण्यात आला. यंदेखूट येथील वनिता विद्यालय, क्लब रोड, गांधीभवन, गांधीनगर ब्रिज, गोवावेस, ग्लोब सर्कल, धर्मवीर संभाजी चौक आदी ठिकाणच्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी तुंबले आहे. त्यातूनच वाहनांची ये-जा सुरू असून सदर पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
महापालिकेची यंत्रणा सज्ज
एकंदरीत 3 जेसीबी, सकिंग मशीन व इतर यंत्रणा महानगरपालिकेकडून सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीनकाळात नागरिकांना मदत मिळावी, यासाठी मनपा आयुक्तांनी तीन पथकांची स्थापना केली आहे. केवळ दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शहरात जलमय वातावरण निर्माण झाले असून अक्षरश: दाणादाण उडाली आहे.