Sangli News : सांगलीत बेकायदेशीर अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोजर
सांगली महापालिकेची डार्क स्पॉटवर दणका!
सांगली : सांगलीत आज शंभर फुटी रोडवर महापालिकेने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवून मोठी कारवाई केली. शहराचे आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः मैदानात उतरून कारवाईची संपूर्ण देखरेख केली. अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे अरुंद झालेला आणि वाहतूक कोंडीतून नेहमीच त्रस्त असलेला हा रस्ता अखेर मोकळा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
सकाळीच महापालिकेचे पथक, भारी यंत्रसामग्री आणि पोलिस बंदोबस्तासह रस्त्यावर दाखल झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केलेली बेकायदा बांधकामे, शेड, दुकानांचे वाढीव भाग आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली. कारवाईदरम्यान काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी मोहिम थांबवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते; परंतु प्रशासन, पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
आयुक्तांनी स्पष्ट संदेश दिला आहे की महापालिकेच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. “शहर अतिक्रमणमुक्त करणे ही आता अपरिहार्य गरज आहे. वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी अशी मोहिम सतत चालू राहील,” असेही त्यांचे म्हणणे आहे.
महापालिकेने पुढील काही दिवसांत शहरातील इतर गर्दीच्या आणि महत्त्वाच्या रस्त्यांवरही अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. शंभर फुटी रोडवरील ही धडक मोहीम पाहून नागरिकांनी आयुक्तांच्या निर्णयाचे आणि भूमिकेचे कौतुक केले आहे.