रणजी ट्रॉफीत मुंबईचा विजयी सिलसिला कायम
सेनादलावर 9 गडी राखून मात : गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी : आयुष म्हात्रे सामनावीर
वृत्तसंस्था/ कटक
रणजी ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईने आपला विजयी सिलसिला कायम राखला. कटक येथील लढतीत मुंबईने सेनादलावर 9 गडी राखून विजय मिळवत सहा गुणाची कमाई केली. या विजयासह मुंबईचा संघ एलिट ए गटात 22 गुणासह तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या डावात महत्वपूर्ण शतकी खेळी साकारणाऱ्या मुंबईच्या आयुष म्हात्रेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, मुंबईने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कर्णधार रहाणेचा हा निर्णय योग्य ठरला. शार्दुल ठाकूरचे 4 बळी व शम्स मुलानी, मोहित अवस्थी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर सेनादलाचा पहिला डाव 240 धावांत आटोपला. यानंतर पहिल्या डावात खेळताना मुंबईने आयुष म्हात्रेच्या (116) शतकी खेळीच्या जोरावर 288 धावा केल्या व 48 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना सेनादलाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मुंबईकरांच्या गोलंदाजीसमोर सेनादलाचा दुसरा डाव 182 धावांत संपुष्टात आला. अर्जुन शर्मा (39) व पुलकित नारंग (35) वगळता इतरांनी निराशा केली. मुंबईकडून मोहित अवस्थीने 4 तर शार्दुल ठाकूरने 3 बळी घेण्याची किमया केली. सेनादलाला 182 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईला विजयासाठी 135 धावांचे टार्गेट मिळाले. ते त्यांनी 1 गड्याच्या मोबदल्यात पार करत दणदणीत विजय मिळवला. मुंबईकडून रघुवंशीने 6 चौकारासह नाबाद 55 तर सिद्धेश लाडने 93 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह नाबाद 93 धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
सेनादल प.डाव 240 व दुसरा डाव 182
मुंबई प.डाव 288 व दुसरा डाव 1 बाद 137
पश्चिम बंगालच्या विजयात शमीचे योगदान, मध्य प्रदेशवर 11 धावांनी मात
इंदोर : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पश्चिम बंगालने मध्य प्रदेशवर 11 धावांनी विजय मिळवला. बंगालच्या या विजयात शमीचे मोठे योगदान राहिले. मध्य प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात शमीला पहिल्या डावात 4 विकेट घेण्यात यश मिळाले. त्याने 19 षटके टाकली आणि 54 धावा दिल्या. यानंतर बंगालच्या दुसऱ्या डावात शमीने फलंदाजीत आपले हात उघडले आणि 36 चेंडूंत 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकारांचाही समावेश होता. मध्य प्रदेशच्या दुसऱ्या डावात शमीने पुन्हा चमकदार कामगिरी करत 3 बळी घेतले. त्याने 24.2 षटके गोलंदाजी करताना 102 धावा दिल्या.
इतर सामन्यांचे निकाल
- गुजरात 343 व 237/9 वि विदर्भ 545/9, सामना अनिर्णीत
- झारखंड 382 वि दिल्ली 388/7, सामना अनिर्णीत.
- सौराष्ट्र 531/9 घोषित वि चंदीगड 249 व 223, सौराष्ट्र डावाने विजयी
- केरळ 291 व 125/2 घोषित वि हरियाणा 164 व 52/2, अनिर्णीत
- युपी 89 व 446 वि कर्नाटक 275 व 178/5, सामना अनिर्णीत.