मुंबईचे विदर्भला 538 धावांचे कठीण आव्हान
मुशीर खानचे शतक, अय्यर, रहाणे, मुलानी यांची अर्धशतके, हर्ष दुबेचे 5 बळी
वृत्तसंस्था/ मुंबई
मुशीर खानचे दमदार शतक (136) तसेच अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान मुंबईने रणजी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात येथील वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभा करत विदर्भला निर्णायक विजयासाठी 538 धावांचे कठीण आव्हान दिले.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 224 धावा जमविल्यानंतर विदर्भचा पहिला डाव केवळ 105 धावात आटोपला. मुंबईने विदर्भबरोबर पहिल्या डावात 119 धावांची भक्कम आघाडी मिळविली. मुंबईच्या पहिल्या डावात शार्दूल ठाकुरने समयोचित अर्धशतक झळकविले. तर विदर्भच्या पहिल्या डावात धवल कुलकर्णी कोटियान आणि मुलाणी यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. मुंबईच्या या तीन गोलंदाजांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मुंबईने 2 बाद 141 या धावसंख्येवरून मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला. मुशीर खान आणि अजिंक्य रहाणे या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 130 धावांची भागिदारी केली. 58 धावांवर नाबाद राहिलेल्या रहाणेने एक अप्रतिम चौकार मारला. पण विदर्भच्या हर्ष दुबेने त्याला वाडकरकरवी झेलबाद केले. कर्णधार रहाणेने 143 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 73 धावा जमविल्या. मुशीर खान आणि श्रेयस अय्यर यांनी विदर्भच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. अय्यरने आक्रमक फटकेबाजी करताना 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 62 चेंडूत अर्धशतक नोंदविले. उपाहारावेळी मुंबईने 85 षटकात 3 बाद 262 धावा जमविल्या. मुशीर खान 86 तर अय्यर 68 धावावर खेळत होते. मुशीर खानने खेळाच्या पहिल्या सत्रात केवळ 35 धावा जमविल्या.
उपाहारानंतर मुशीर खान आणि अय्यर यांनी चौथ्या गड्यांसाठी शतकी भागिदारी 157 चेंडूत नोंदविली. दरम्यान विदर्भने दुसरा नवा चेंडू घेतला आणि त्यानंतर मुशीर खानने आपले शतक 255 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने झळकविले. मुंबईच्या 300 धावा 551 चेंडूत फलकावर लागल्या. अय्यर आणि मुशीर खान यांनी चौथ्या गड्यासाठी दीड शतकी भागिदारी 150 चेंडूत पूर्ण केली. आदित्य ठाकरेंने मुंबईची ही जोडी फोडण्यात यश मिळविले. ठाकरेच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर झेलबाद झाला.
त्याचे शतक 5 धावांनी हुकले. अय्यरने 111 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 95 धावांची खेळी खेळताना मुशीर खानसमवेत चौथ्या गड्यासाठी 168 धावांची भागिदारी केली. यश ठाकुरने तेमोरेला 5 धावावर त्रिफळाचित केले. चहापानावेळी मुंबईने 6 बाद 357 धावा जमविल्या होत्या. चहापानापूर्वी मुशीर खान बाद झाला. दुबेने त्याला पायचित केले. मुशीर खानने 326 चेंडूत 10 चौकारांसह 136 धावा जमविल्या. चहापानानंतर मुंबईच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकविणारा शार्दूल ठाकुर खाते उघडण्यापूर्वीच दुबेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. मुलाणीने 85 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 50 धावा जमविल्या. कोटियानने 1 चौकारांसह 13 तर तुषार देशपांडेने 2 धावा केल्या. धवल कुलकर्णींला आपले खाते उघडता आले नाही. मुंबईचा दुसरा डाव 130.2 षटकात 418 धावावर आटोपला. विदर्भतर्फे हर्ष दुबे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 144 धावात 5 तर यश ठाकुरने 89 धावात 3 तसेच आदित्य ठाकरे व मोकाडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर विदर्भने दुसऱ्या डावात 2 षटकार बिनबाद 10 धावा केल्या. ध्रुव शोरे 7 तर तायडे 3 धावावर खेळत आहे. या सामन्यातील खेळाचे 2 दिवस बाकी असून विदर्भला विजयासाठी 528 धावांची गरज असून त्यांचे सर्व गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक - मुंबई प. डाव 224, विदर्भ प. डाव 105, मुंबई दु. डाव 130.2 षटकात सर्वबाद 418 (मुशीर खान 136, रहाणे 73, अय्यर 95, मुलाणी नाबाद 50, यश ठाकुर 3-79, हर्ष दुबे 5-144), विदर्भ दु. डाव 2 षटकात बिनबाद 10.
सचिन, गावसकर, रोहितची उपस्थिती
या रणजी स्पर्धेतील अंतिम सामन्याला मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा यांनी खास उपस्थिती दर्शविली. अलिकडेच भारताने इंग्लंडबरोबरची कसोटी मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. सध्या भारतामध्ये क्रिकेटपटूंना रेडबॉल क्रिकेटची अत्यंत गरज असल्याचे मत सचिन आणि रोहित शर्मा यांनी व्यक्त केले. मंगळवारी रोहित शर्माने मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये उपस्थिती दर्शविली. 5 सामन्यांची कसोटी मालिका संपल्याने रोहित जरा रिलॅक्स मूडमध्ये दिसत होता. आता 2024 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. रोहित शर्माने शार्दूल ठाकुरबरोबर कांही वेळ चर्चा केली. मुंबईच्या श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारातून वगळण्यात आले. तसेच भारतीय कसोटी संघातही त्याला स्थान मिळू शकले नाही. रोहितने श्रेयसच्या फलंदाजीचे निरीक्षण केले.
सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एमसीएचे अध्यक्ष तसेच सचिन तेंडूलकर यांनी मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये आपले दर्शन घडविले. ड्रेसिंगरूममध्ये माजी कसोटीवीर दिलीप वेंगसरकर, सुब्रतो बॅनर्जी, चंद्रकांत पंडित, सुनील गावसकर, क्रिकेट प्रशासक रत्नाकर शेट्टी, भारतीय महिला संघाची माजी कर्णधार डायना एडलजी, मुंबईचे माजी कर्णधार आणि मुंबईच्या निवड समितीचे प्रमुख मिलिंद रेगे यांनी आपली हजेरी लावली.