मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय
रणजी चषकातील पहिला विजय : महाराष्ट्रावर दारुण पराभवाची नामुष्की
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी मुंबईतील बांद्रा-कुर्ला स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने महाराष्ट्राचा नऊ गडी राखून पराभव केला. यासह मुंबईने रणजी करंडक 2024-25 या हंगामातील पहिला विजय नोंदवला. या सामन्यात पृथ्वी शॉ आणि हार्दिक तामोर यांनी चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात महाराष्ट्राने दिलेल्या 74 धावांचे लक्ष्य सहज पार केले. या विजयासह मुंबईला सहा गुण मिळाले आहेत. दरम्यान, पहिल्या डावात शानदार शतकी खेळी साकारणाऱ्या मुंबईच्या आयुष म्हात्रेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्राला या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रारंभी, या सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रातच मुंबईने महाराष्ट्राला 126 धावांत गुंडाळले होते. प्रत्युत्तरात 17 वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेने शानदार शतक झळकावून संघाचा पाया रचला, त्यानंतर श्रेयस अय्यरने आणखी एक शतक झळकावून संघाला 315 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड व अंकित बावणेच्या शानदार शतकामुळे महाराष्ट्राने दुसऱ्या डावात कडवे आव्हान उभे केले, पण, पाहुणा संघ विजय मिळवू शकला नाही. महाराष्ट्राचा दुसरा डाव 388 धावांत आटोपल्यानंतर मुंबईला विजयासाठी 74 धावांचे सोपे टार्गेट मिळाले. विजयासाठीचे हे लक्ष्य मुंबईने 13.3 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. पृथ्वी शॉने नाबाद 39 धावा केल्या तर हार्दिक तोमोरने 21 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
दरम्यान, मुंबईचा हा रणजी चषकातील पहिला विजय ठरला. याआधी पहिल्या सामन्यात बडोद्याने मुंबईला नमवले होते. महाराष्ट्राला मात्र स्पर्धेत अद्याप खाते खोलता आलेले नाही. स्पर्धेतील पहिला सामना महाराष्ट्राने अनिर्णीत राखला होता तर या दुसऱ्या सामन्यात मुंबईकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र प.डाव 126 व दु.डाव 388
मुंबई प.डाव 441 व दु.डाव 13.3 षटकांत 1 बाद 75 (पृथ्वी शॉ 39, आयुष म्हात्रे 15, हार्दिक तोमोर 21, सत्यजीत बच्छाव 1 बळी).
बडोद्याचा सलग दुसरा विजय, विदर्भांची पाँडेचरीवर मात
रणजी चषकातील दुसऱ्या सामन्यात बडोद्याने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद करताना सेनादलावर 65 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बडोद्याला 6 गुण मिळाले आहेत. याशिवाय, स्पर्धेतील ब गटातील एका सामन्यात विदर्भाने पाँडेचरीला 120 धावांनी नमवत सहा गुणांची कमाई केली. तसेच गुजरातने आंध्र प्रदेशला तर राजस्थाने हिमाचल प्रदेशवर दणदणीत विजयाची नोंद केली.