मुंबईची वाटचाल मोठ्या विजयाकडे
वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरु असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ड गटातील सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळताना यजमान मुंबईचा संघ मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मुंबईने पहिल्या डावात 446 धावा जमविल्यानंतर हिमाचल प्रदेशची पहिल्या डावात स्थिती 7 बाद 94 अशी केविलवाणी झाली आहे. मुंबई संघातील फिरकी गोलंदाज हिमांशू सिंगने 26 धावांत 3 गडी बाद केले.
या सामन्यात हिमाचल प्रदेशचा संघ 352 धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईने 5 बाद 289 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांच्या शेवटच्या 5 गड्यांनी 157 धावांची भर घातली. मुंबईच्या पहिल्या डावात मुशीर खान आणि सिद्धेश लाड यांनी शानदार शतके झळकाविताना अनुक्रमे 112 व 127 धावा जमविल्या. अष्टपैलू मुल्लानीने 122 चेंडूत 9 चौकारांसह 69 तर तुषार देशपांडेने 38 धावा केल्या. हिमाचल प्रदेशच्या दागरने 111 धावांत 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूर आणि सिद्धांत पुरोहित यांच्या भेदक माऱ्यासमोर हिमाचल प्रदेशचे फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर हिमांशू सिंगच्या फिरकीसमोर हिमाचल प्रदेशचा डाव कोलमंडला. 37 षटकात हिमाचल प्रदेशने पहिल्या डावात 7 बाद 94 धावा जमविल्या. पुखराज मानने 34 धावा केल्या. सेन आणि दागर हे लवकर बाद झाले. निखिल गंगता 27 धावांवर खेळत आहे. मुंबईतर्फे तुषार देशपांडेने 2 तर हिमांशू सिंगने 3 गडी बाद केले. हिमाचल प्रदेशचा संघ आता फॉलोऑनच्या छायेत वावरत आहे.
संक्षिप्त धावफलक - मुंबई प. डाव 446 (मुशिर खान 112, लाड 127, मुल्लानी 69, दागर 4-111), हिमाचल प्रदेश 37 षटकात 7 बाद 94 (पुखराज मान 34, निखिल गंगता खेळत आहे 27, सेन 15, दागर 4, हिमांशू सिंग 3-26, तुषार देशापांडे 2-21).