रेखाडेच्या फिरकीसमोर मुंबईचा डाव घसरला
विदर्भ प. डाव 383, मुंबई प. डाव 7 बाद 188, अद्याप 195 धावांनी पिछाडीवर
वृत्तसंस्था/ नागपूर
डावखुरा फिरकी गोलंदाज पार्थ रेखाडेच्या गोलंदाजीसमोर मुंबईचा पहिला डाव घसरल्याने येथे सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील उपांत्य सामन्यावर यजमान विदर्भने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. खेळाच्या दुसऱ्या दिवशीअखेर विदर्भचा संघ 195 धावांनी आघाडीवर आहे.
या सामन्यात विदर्भने 5 बाद 308 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 5 गडी 75 धावांत बाद झाले. विदर्भच्या यश राठोडने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 113 चेंडूत 7 चौकारांसह 54 धावा जमविल्या. विदर्भच्या पहिल्या डावात ध्रुव शोरेने 74 तर दानिश मालेवारने 79 धावा जमविल्या. मुंबईतर्फे शिवम दुबे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 49 धावांत 5 तर मुलानीने 62 धावांत 2 गडी बाद केले. रॉयस्टन डायसने 48 धावांत 2 तर शार्दुल ठाकुरने 78 धावांत 1 गडी बाद केला. उपाहारापूर्वी विदर्भचा पहिला डाव संपुष्टात आला.
विदर्भचा पहिला डाव 383 धावांवर समाप्त झाल्यानंतर मुंबईच्या पहिल्या डावाला थोडी डळमळीत सुरुवात झाली. सलामीचा फलंदाज आयुष म्हात्रे डावातील 11 व्या षटकात नलकांडेच्या गोलंदाजीवर मालेवारकरवी झेलबाद झाला. त्याने 1 चौकारासह 9 धावा केल्या. उपाहारावेळी मुंबईने 6 षटकात 1 बाद 19 धावा जमविल्या होत्या. मात्र आकाश आनंद आणि सिद्धेश लाड यांनी संघाची स्थिती बऱ्यापैकी सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. मुंबईची ही जोडी यश ठाकुरने फोडली. ठाकुरच्या गोलंदाजीवर सिद्धेश लाडचा त्रिफळा उडाला त्याने 92 चेंडूत 4 चौकारांसह 35 धावा जमविल्या. लाड बाद झाल्यानंतर कर्णधार रहाणेने सावध फलंदाजीवर अधिक भर दिला. नागपूरच्या खेळपट्टीवर रेखाडेचे चेंडू चांगलेच वळत होते. मुंबईची एकवेळ स्थिती 2 बाद 113 अशी समाधानकारक होती पण त्यानंतर त्यांनी आपले 4 गडी लवकर गमविले आणि 41.5 षटकाअखेर मुंबईची स्थिती 6 बाद 118 अशी झाली होती.
रेखाडेची प्रभावी गोलंदाजी
मुंबईच्या पहिल्या डावातील 41 वे षटक महत्त्वाचे ठरले. या षटकामध्ये पार्थ रेखाडेने पहिल्या चेंडूवर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा त्रिफळा उडविला. त्याने 24 चेंडूत 4 चौकारांसह 18 धावा जमविल्या. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला खाते उघडण्यापूर्वी मालेवारकरवी झेलबाद केले. त्यानंतर रेखाडेने शिवम दुबेला खाते उघडण्यापूर्वीच तायडेकडे झेल देण्यास भाग पाडले. मुलानी हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 4 धावा केल्या. मुंबईचे 4 फलंदाज केवळ 5 धावांत तंबूत परतल्याने विदर्भने सामन्यावरील आपली पकड अधिकच मजबूत केली.
सलामीचा आकाश आनंद आणि अष्टपैलू शार्दुल ठाकुर यांनी मात्र 7 व्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. सलामीच्या आकाश आनंदने 135 चेंडूत 4 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी यश ठाकुरने शार्दुल ठाकुरला झेलबाद केले. त्याने 41 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 37 धावा जमविल्या. दिवस अखेर आकाश आनंद 6 चौकारांसह 67 धावांवर तर कोटीयान 1 चौकारासह 5 धावांवर खेळत आहेत. मुंबईचा संघ अद्याप 195 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 3 गडी खेळावयाचे आहेत. विदर्भतर्फे पार्थ रेखाडेने 16 धावांत 3 तर यश ठाकुरने 56 धावांत 2 त्याचप्रमाणे दर्शन नलकांडे आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ प. डाव 107.5 षटकात सर्वबाद 383 (शोरे 74, रेखाडे 23, मालेवार 79, करुण नायर 45, यश राठोड 54, अक्षय वाडकर 34, हर्ष दुबे 18, भुते 11, नलकांडे नाबाद 12, अवांतर 26, शिवम दुबे 5-49, डायस 2-48, शार्दुल ठाकुर 1-78, मुलानी 2-62), मुंबई प. डाव 59 षटकात 7 बाद 188 (आकाश आनंद खेळत आहे 67, लाड 35, रहाणे 18, शार्दुल ठाकुर 37, अवांतर 13, पार्थ रेखाडे 3-16, यश ठाकुर 2-56, नलकांडे आणि हर्ष दुबे प्रत्येकी 1 बळी).