For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वानखेडेवर मुंबईचा फ्लॉप शो, सलग तिसरा पराभव

06:58 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
वानखेडेवर मुंबईचा फ्लॉप शो  सलग तिसरा पराभव
Advertisement

राजस्थानची विजयाची हॅट्ट्रिक : रियान परागचे नाबाद अर्धशतक : सामनावीर ट्रेंट बोल्ट व चहलचे प्रत्येकी तीन बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपल्या विजयाची हॅट्ट्रीक साधताना स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. 22 धावांत 3 गडी बाद करणाऱ्या ट्रेन्ट बोल्टला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 9 बाद 125 धावांवर रोखले. राजस्थानच्या बोल्ट आणि चहल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकात 4 बाद 127 धावा जमवित शानदार विजय नोंदविला.

यशस्वी जैस्वाल आणि बटलर या जोडीने राजस्थानच्या डावाला सुरुवात केली. पण पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर माफाकाने जैस्वालला झेलबाद केले. त्याने 6 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. बटलर आणि कर्णधार सॅमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 32 धावांची भर घातली. मधवालच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात सॅमसन त्रिफळाचीत झाला. त्याने 10 चेंडूत 3 चौकारांसह 12 धावा जमविल्या. मधवालने बटलरला चावलाकरवी झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 2 चौकारासह 13 धावा झळकाविल्या. रियान पराग आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने चौथ्या गड्यासाठी 40 धावांची भागिदारी केली. मधवालने अश्विनला तिलक वर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 16 चेंडूत 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. रियान परागने शुभम दुबेच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. परागने 39 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 54 धावा झळकाविल्या. तो  तर दुबेने 6 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 8 धावा केल्या. राजस्थानला अवांतर 14 धावा मिळाल्या. मुंबई इंडियन्सतर्फे मधवालने 20 धावांत 3 तर माफेकाने 23 धावांत 1 गडी बाद केला.

राजस्थानने पॉवरप्लेच्या 6 षटकात 46 धावा जमविताना 2 गडी गमाविले. राजस्थानचे अर्धशतक 42 चेंडूत तर शतक 82 चेंडूत फलकावर लागले. परागने 38 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकवले. राजस्थानच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नेंदविले.

मुंबईच्या फलंदाजांचा फ्लॉप शो

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सला 3 पाठोपाठ धक्के दिल्याने हा संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर बोल्टने रोहित शर्माला सॅमसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर बोल्टने या षटकातील शेवटच्या चेंडूवर नमन धीरला पायचीत केले. बोल्टने आपल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नमनच्या जागी आलेला इम्पॅक्ट प्लेअर ब्रेव्हिसला खाते उघडण्यापूर्वी बर्गरकरवी झेलबाद केले. दरम्यान बर्गरने सलामीच्या इशान किशनला यष्टीरक्षक सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. इशान किशनने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. मुंबईची यावेळी स्थिती 4 बाद 20 अशी केविलवाणी होती. तिलक वर्मा व कर्णधार हार्दिक पंड्या यांनी पाचव्या गड्यासाठी 56 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. चहलच्या गोलंदाजीवर पंड्या बदली खेळाडू पॉवेलकरवी झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूत 6 चौकारांसह 34 धावा जमविल्या. आवेश खानने चावलाला 3 धावांवर बाद केले. चहलने तिलक वर्माला अश्विनकरवी झेलबाद केले. त्याने 29 चेंडूत 2 षटकारांसह 32 धावा जमविल्या. टीम डेव्हिडने 1 चौकारासह 17 धावा केल्या. कोझीने 4 धावा जमविल्या. बुमराह आणि मधवाल हे अनुक्रमे 8 आणि 4 धावांवर नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सच्या डावात 3 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. मुंबईला 7 अवांतर धावा मिळाल्या.

मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेच्या 6 षटकात 46 धावा जमविताना 4 गडी गमविले. मुंबईचे अर्धशतक 40 चेंडूत तर शतक 88 चेंडूत फलकावर लागले. तिलक वर्मा आणि पंड्या यांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 32 चेंडूत नोंदविली. राजस्थान रॉयल्सतर्फे बोल्टने 22 धावांत 3, चहलने 11 धावात 3, बर्गरने 32 धावांत 2 व आवेश खानने 30 धावांत 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - मुंबई इंडियन्स 20 षटकात 9 बाद 125 (इशान किशन 16, तिलक वर्मा 32, हार्दिक पंड्या 34, डेव्हिड 17, बुमराह नाबाद 8, मधवाल नाबाद 4, अवांतर 7, बोल्ट 3-22, चहल 3-11, बर्गर 2-32, आवेश खान 1-30). राजस्थान रॉयल्स 15.3 षटकात 4 बाद 127 (जैस्वाल 10, बटलर 13, सॅमसन 12, रियान पराग नाबाद 54, आर. अश्विन 16, शुभम दुबे नाबाद 8, अवांतर 14, मधवाल 3-20, माफाका 1-23).

रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज

वानखेडेवर झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 17 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. यानंतर आरसीबीचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा क्रमांक लागतो. तो आतापर्यंत 15 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद झालेले खेळाडू

  1. रोहित शर्मा व दिनेश कार्तिक - 17
  2. ग्लेन मॅक्सवेल - 15
  3. पीयूष चावला - 15
  4. मनदीप सिंग - 15.
Advertisement
Tags :

.