मुंबईचा रेल्वेवर मोठा विजय
वृत्तसंस्था/ लखनौ
विद्यमान विजेत्या मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मोहिमेची सुरुवात विजयाने करताना रेल्वेवर 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. गट अ मधील या सामन्यात अजिंक्य रहाणे व सूर्यकुमार यादव यांनी उपयुक्त योगदान दिले.
रेल्वेने 20 षटकांत 5 बाद 158 धावा जमविल्यानंतर मुंबईने 25 चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळविला. रहाणेने 33 चेंडूत 62 धावा फटकावताना 4 चौकार, 5 षटकार मारले. सूर्यकुमारसमवेत त्याने दुसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. सूर्यानेही 30 चेंडूत 47 धावा फटकावल्या.रेल्वेच्या डावात 2 बाद 19 अशा स्थितीनंतर मोहम्मद सैफने 48 धावा जमविताना रवी सिंग (19 चेंडूत 26), आशुतोष शर्मा (30 चेंडूत 61) यांच्या साथीने संघाला सुस्थितीत नेले होते. सैफ बाद झाला तेव्हा त्यांची स्थिती 4 बाद 113 अशी होती. आशुतोष शर्माने आक्रमक फटकेबाजी करीत 7 चौकार, 3 षटकारांसह अर्धशतकी खेळी केली.
अन्य सामन्यांत छत्तीसगडने बलाढ्या विदर्भचा 27 धावांनी पराभव केला. छत्तीसगडने 9 बाद 133 धावा जमविल्यानंतर विदर्भला 19.1 षटकांत 106 धावांत गुंडाळून विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक : रेल्वे 20 षटकांत 5 बाद 158 (सैफ 48, आशुतोष शर्मा 61), मुंबई 15.5 षटकांत 3 बाद 159 (रहाणे 62, सूर्यकुमार यादव 47). छत्तीसगड 20 षटकांत 9 बाद 133, विदर्भ 19.1 षटकांत सर्व बाद 106.