रेमोच्या पॉपवर थिरकले मुंबईकर
रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : कुटुंब इव्हेंट गोवा यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई : भारतातील पॉप संगीताचा प्रणेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेमो फर्नांडिस यांच्या मुंबईत झालेल्या लाईव्ह कार्यक्रमाला रेमोच्या चाहत्यांनी तसेच रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात निलेश यशवंत फातर्पेकर आणि अभिलाष आशा वेलिंगकर यांच्यावतीने 4 मे रोजी रेमो आणि मायक्रोवेव्ह पापदम्सच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंब इव्हेंट गोवा यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक हे एलआयसी तर सहप्रायोजक हे लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी होती. रेमोचे पॉप गायन तसेच त्याची गिटार, बासरी तसेच इतर वाद्यांवर असलेली हुकुमत या कार्यक्रमातून पुन्हा एकदा पहायला मिळाली. ‘ओ मेरी मुन्नी...’ असो किंवा बॉम्बे चित्रपटातील ‘हम्मा हम्मा...’ या गाण्याला रसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. इंडियन लेडी हे गाण गात असताना उपस्थित असणाऱ्या महिला वर्गाला या गाण्याचा एक भाग बनवत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
आपल्या गाण्यांमध्ये गिटार आणि बासरीचा वापर करत भारतीय संगीतात रेमो यांनी एक वेगळाच अभिनव प्रयोग केला. त्याला लोकांनी चांगलेच उचलून घेतले. शनिवार त्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांचा हंगाम असताना देखील रेमोवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. इंग्रजी, हिंदी आणि कोकणी गाण्यांचे रेमो यांनी सादरीकरण केले. मुंबईत राहणाऱ्या पण मुळचे गोवेकर यांनी रेमो यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती ती विशेष लक्षणीय होती. यावेळी एलआयसीचे वेस्टर्न झोनचे विभागीय व्यवस्थापक कमल कुमार, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व तऊण भारतचे समूह प्रमुख किरण ठाकुर, विनय गाथाणी, आयुर्वेदिक कॉलेजचे माजी मुख्याध्यापक जोशी सर, अनिल त्रिवेदी, आशा वेलिंगकर, निलेश फातर्पेकर आदी मान्यवर उपस्थित होते.