रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
पंजाब पराभूत : आशुतोष शर्माची तुफानी खेळी वाया : मुंबईच्या डावात ‘सूर्या’ची चमक : सामनावीर बुमराहचे 3 बळी
वृत्तसंस्था /मुल्लानपूर
येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 9 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 बाद 192 धावा जमविल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव 19.1 षटकांत 183 धावांवर आटोपला. या विजयासह मुंबईने सहा गुणासह गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. पराभवामुळे पंजाबची नवव्या स्थानी घसरण झाली आहे. दरम्यान, 21 धावांत 3 बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मुंबईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा सामना करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. पंजाबनं अवघ्या 77 धावांपर्यंत सहा फलंदाज गमावले होते. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार सॅम करन सहा धावा काढून बाद झाला. प्रभसिमरनला खातेही उघडता आले नाही. रायली रुसो फक्त एक धाव काढून बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोनही एका धावेवरच बाद झाला. हरप्रीत सिंहही 13 धावांवर गोपालचा शिकार ठरला. मुंबईच्या भेदक म्रायासमोर पंजाबची आघाडीची फळी ढेपाळली. जितेश शर्माही फक्त नऊ धावा काढून बाद झाला. पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या.
अडचणीत सापडेल्या पंजाबसाठी शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा पुन्हा एकदा धावून आले. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढत विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. शशांक सिंहने 25 चेंडूत 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये तीन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. शशांक बाद झाल्यानंतर मुंबई सामना आरामात जिंकेल असं वाटत होतं. पण आशुतोष शर्माने एकाकी झुंज दिली. आशुतोषने हरप्रीत ब्रारला सोबत घेत किल्ला लढवला. आशुतोष शर्माने 28 चेंडूमध्ये 61 धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या शानदार खेळीमध्ये सात गगनचुंबी षटकार आणि दोन खणखणीत चौकार लगावले. हरप्रीत ब्रार यानं 21 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. आशुतोष आणि ब्रार बाद झाल्यानंतर पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. मुंबईने नऊ धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवले आहे.
सूर्याची फटकेबाजी, रोहितचीही आक्रमक खेळी
या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. पंजाबच्या रबाडाने सलामीच्या इशान किशनला ब्रारकरवी झेलबाद केले. त्याने 8 धावा जमविल्या. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 9.3 षटकात 81 धावांची भागीदारी केली. सॅम करनने शर्माला ब्रारकरवी झेलबाद केले. त्याने 25 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा जमविल्या. शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने स्वत:कडे फलंदाजी अधिक राखत धावांचा वेग वाढविला. तिलक वर्मासमवेत त्याने तिसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 53 चेंडूत 3 षटकार 7 चौकारांसह 78 धावा झळकविल्या. सॅम करनने त्याला झेलबाद केले. कर्णधार हार्दिक पंड्या हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ब्रारकरवी झेलबाद झाला. त्याने 10 धावा जमविल्या. हर्षल पटेलने आपल्या शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डेव्हीडला करनकरवी झेलबाद केले. त्याने 14 धावा जमविल्या. हर्षल पटेलने आपल्या या षटकातील 5 व्या चेंडूवर शेफर्डला 1 धावेवर झेलबाद केले. तर डावातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद नबी खाते उघडण्यापूर्वी धावचित झाला. हर्षल पटेलच्या या शेवटच्या षटकात मुंबईने 3 गडी गमविले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकात 7 बाद 192 (इशान किशन 8, रोहित शर्मा 36, सूर्यकुमार यादव 78, तिलक वर्मा नाबाद 34, हार्दिक पंड्या 10, टिम डेव्हिड 14, शेफर्ड 1, अवांतर 11, हर्षल पटेल 3-31, सॅम करन 2-41, रबाडा 1-42, किंग्ज इलेव्हन पंजाब 19.1 सर्वबाद 183 (शशांक सिंग 41, आशुतोष शर्मा 61, एच ब्रार 21, रबाडा 8, बुमराह व कोएत्झी प्रत्येकी तीन बळी, मधवाल, हार्दिक व श्रेयस गोपाल प्रत्येकी एक बळी).
रोहितचा असाही अनोखा विक्रम
पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये एक खास पराक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्मा आधी हा विक्रम केवळ महेंद्रसिंह धोनीनेच केला आहे. रोहित 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. पंजाबविरुद्ध खेळला जाणारा सामना हा रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील 250 वा सामना आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू
- एमएस धोनी - 256 सामने
- रोहित शर्मा - 250 सामने
- दिनेश कार्तिक - 249 सामने
- विराट कोहली - 244 सामने