सूर्याच्या नेतृत्वात मुंबई पहिला सामना खेळणार
नियमित कर्णधार हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी : दुखापतीमुळे बुमराहच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह
वृत्तसंस्था/ मुंबई
बहुप्रतिक्षित आयपीएलचा 18 वा सीझन येत्या 22 मार्चपासून सुरु होत आहे. याचबरोबर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. पण मुंबईच्या पहिल्याच सामन्यात संघाचा कर्णधार मैदानाबाहेर असेल. आयपीएल 2024 मधील अखेरच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. हार्दिक आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे आता हार्दिकच्या जागी सुर्यकुमार यादव नेतृत्व करताना दिसणार असल्याची माहिती मुंबईचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी दिली आहे. तसेच दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज बुमराह पहिल्या काही सामन्यात खेळू शकणार नाही.
मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेपूर्वीची पत्रकार परिषद बुधवारी झाली. या पत्रकार परिषदेसाठी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि कोच महेला जयवर्धने उपस्थित होते. यादरम्यान हार्दिकने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. हार्दिक म्हणाला, आयपीएल 2024 मधील अखेरच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे माझ्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या हंगामातील चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही. अशावेळी सुर्यकुमार यादव पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा कर्णधार असणार आहे. सध्या सूर्या भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आहे. माझ्या अनुपस्थितीत, तो कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार आहे, असे तो म्हणाला.
बुमराहच्या खेळण्याबाबत साशंकता
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याची माहिती जयवर्धने यांनी यावेळी दिली. बुमराह सध्या बेंगळूरमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. त्याची प्रकृती चांगली आहे. पण, त्याचे न खेळणे हे संघासाठी एक आव्हान आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या रिपोर्टची आम्हाला प्रतिक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो संघात पुनरागमन करु शकेल, अशी आशा असल्याचेही जयवर्धने यावेळी म्हणाले.
एमआयचे पहिले दोन सामने बाहेर
आयपीएलचा नवा हंगाम 22 मार्च रोजी कोलकाता येथे सुरु होईल. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात खेळला जाईल. मुंबई 23 मार्च रोजी चेपॉक येथे चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर 29 मार्च रोजी ते अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळतील. मुंबईचा पहिला घरचा सामना 31 मार्च रोजी केकेआरविरुद्ध होईल.
मुंबई इंडियन्सचा संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश.
आयपीएल उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड स्टार्स लावणार चार चांद
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलचा नवीन हंगामातील पहिला सामना दि. 22 रोजी केकेआर आणि आरसीबी यांच्यात ईडन गार्डनवर होईल. दरम्यान, 18 व्या इंडियन प्रिमियर लीग आवृत्तीच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी थिरकणार असल्याचे आयपीएलच्या अधिकृत एक्स हँडलवर सांगितले आहे. दिशा पटानीसमवेत गायक करण औजला व श्रेया घोषाल हे देखील आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. या सोहळ्याला आयसीसी अध्यक्ष जय शहा व अन्य मान्यवर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. तसेच अनेक बॉलिवूड स्टार्सही सहभागी होणार आहेत. दिग्गज अभिनेता शाहरुख खान केकेआरच्या उद्घाटन सामन्यात सहभागी होणार आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा, सलमान खान, अरिजित सिंग आणि श्रद्धा कपूरसारखे स्टार्स देखील हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिकीट विक्रीला जोरदार प्रतिसाद
आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर, तिकीट बुकिंग प्रक्रिया चर्चेचा विषय बनली आहे. आयपीएल सामन्याचे तिकीट BookMyShow, Paytm वरून देखील खरेदी करता येईल. दरम्यान, केकेआर व आरसीबी यांच्यात सलामीचा सामना होणार असून या सामन्याची तिकीटे जवळपास संपली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय, 23 मार्च रोजी मुंबई व चेन्नई हा सामना हाऊसफुल्ल झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.