मुंबईचा मुकाबला आज गुजरातशी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्याने आपली कारकीर्द हार्दिक पंड्या आज रविवारी गुजरात टायटन्सविऊद्धच्या सामन्याने सुरू करणार असून त्यावेळी रोहित शर्माचा समृद्ध वारसा पुढे चालवण्याचे उद्दिष्ट त्याच्याकडून समोर ठेवले जईल. या स्टार अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये गेल्या दोन हंगामात ज्या संघाचे नेतृत्व केले होते त्याच्याशीच त्याची आज गाठ पडणार आहे. मागील दोन हंगामात टायटन्सला विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळवून दिल्यानंतर पंड्या आता मुंबई इंडियन्सकडे परतला आहे.
ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या दरम्यान झालेल्या दुखापतीनंतर पंड्याला मैदानापासून दूर राहावे लागले होते. आता तो त्यातून सावरून पुनरागमन करत आहे. आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी फलंदाजी व गोलंदाजीतील त्याच्या फॉर्मवर साऱ्यांचे लक्ष राहील. पंड्याने बाजू बदलल्याने टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे गेले आहे.
स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसह मुंबईच्या संघाला त्यांच्या प्रमुख खेळाडूंच्या तंदुऊस्तीच्या समस्यांशी झुंजावे लागत आहे. सूर्यकुमारला अद्याप ‘एनसीए’कडून फिटनेस मान्यता मिळालेली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि दिलशान मदुशंका हे आधीच आयपीएलमधून बाहेर पडले आहेत, तर नवीन भरती असलेला जेराल्ड कोएत्झी मांडीच्या दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. मुंबईला तब्बल पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिलेला भारताचा कर्णधार रोहित या मोसमात एक खेळाडू म्हणून उतरणार आहे आणि जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी तो अव्वल फॉर्ममध्ये येईल अशी अपेक्षा आहे.
आणखी एक खेळाडू ज्याच्या कामगिरीवर नजर राहील तो म्हणजे इशान किशन आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासंबंधी मंडळाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने बीसीसीआयचा केंद्रीय करार गमवावा लागल्यानंतर तो आता स्वत:ला सिद्ध करू पाहील. पंड्याव्यतिरिक्त मोहम्मद नबी आणि रोमॅरियो शेफर्ड हे मुंबईकडे दर्जेदार अष्टपैलू पर्याय आहेत. आकाश मधवाल व नेहल वढेरासारखे देशी खेळाडू मागील हंगामापेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखविण्याचा हेतू बाळगून असतील.
टायटन्सच्या आघाडीवर संघाने पहिल्या दोन हंगामांत दाखवलेले उल्लेखनीय सातत्य राखण्याची जबाबदारी गिलवर आहे. आहे. त्यांना मोहम्मद शमीची उणीव भेडसावेल, मात्र रशिद खानचे पुनरागमन हुरुप वाढवून जाईल. नव्याने सामील झालेल्यांपैकी डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन आणि अझमतुल्ला ओमरझाई हे आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.
संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णध्घर), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियूष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वूड, सूर्यकुमार यादव.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोश लिटल, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, सुशांत मिश्रा, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रशिद खान, वृद्धिमान साहा, साई किशोर, साई सुदर्शन, एम. शाहऊख खान, विजय शंकर, बी. आर. शरथ, मोहित शर्मा, मानव सुतार, राहुल तेवतिया, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, जयंत यादव, उमेश यादव.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.