For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहुप्रतीक्षित मुंबई - विदर्भ रणजी चषक अंतिम लढत आजपासून

06:52 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
बहुप्रतीक्षित मुंबई   विदर्भ रणजी चषक अंतिम लढत आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चतुर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई अणि विदर्भ यांच्यातील रणजी चषक स्पर्धेतील बहुप्रतिक्षीत अंतिम सामना आज रविवारपासून सुरू होणार आहे. यावेळी रणजी चषक 42 व्या खेपेला पटकावून आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न यजमान मुंबईकडून केला जाईल. परंतु लढाऊ विदर्भाचे आव्हानही त्यांच्यासाठी सोपे जाणार नाही.

तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा परदेशातील सर्वांत मोठा मालिका विजय नोंदविण्यास ज्याचा मोलाचा हातभार लागला त्या रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मोठी घसरण झाली आहे आणि सध्या तो राष्ट्रीय संघातील स्थानासाठीच्या शर्यतीतही नाही. वेगवान गोलंदाज मोहित अवस्थी (192 धावा) यानेही रहाणेच्या तुलनेत (134) अधिक धावा केल्या आहेत. रहाणेची संपूर्ण स्पर्धेत 13.4 अशी निराशाजनक सरासरी राहिली आहे. तथापि, रहाणेचे नेतृत्व कौशल्य कोणापेक्षा कमी नाही हे सिद्ध झाले आहे. कारण त्याने संघाला 48 व्या खेपेला अंतिम फेरीत पोहोचविताना आपल्याकडील संसाधनांचा चांगला वापर केला आहे.

Advertisement

सूर्यकुमार यादव जखमी झाल्याने, तर सर्फराज खान भारत ‘अ’ संघासाठी आणि त्यानंतर कसोटी मालिकेसाठी निवड झाल्याने उपलब्ध होऊ शकला नाही. श्रेयस अय्यरने दुखापतीचे कारण सांगून काही सामने टाळले. दुखापतीतून सावरलेला पृथ्वी शॉ (5 सामने) मोसमाच्या शेवटी उपलब्ध झाला. शिवम दुबे, शार्दुल ठाकूर हेही अर्धेच सामने खेळले. अशा परिस्थितीत रहाणेही फॉर्मात नसला, तरी त्याने आणि त्याच्या खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश करताना सर्व आव्हाने यशस्वीपणे पेलली आहेत.

त्यांचा सामना दोन वेळचे विजेते विदर्भाशी आहे. त्यांनी महत्त्वाच्या क्षणी आपला खेळ उंचावून दाखविलेला आहे. 150 हून अधिक कसोटी बळी मिळविलेला त्यांचा वेगवान गोलंदाज उमेश यादव मुंबईच्या वरच्या फळीला सतावू शकतो. मुंबईच्या फलंदाजांनी या मोसमात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यासारखी मोठी धावसंख्या उभारलेली नाही, परंतु त्यांच्या तळाकडच्या फलंदाजांनी व मधल्या फळीने प्रसंगी उभे ठाकून अडचणीच्या परिस्थितीतही धावा केल्या आहेत. यात यष्टिरक्षक-फलंदाज हार्दिक तामोरे (252 धावा), तनुष कोटियन (481 धावा), शम्स मुलानी (290 धावा) आणि तुषार देशपांडे (168 धावा) यांचा समावेश होतो. दुबे आणि ठाकूर यांनी बाद फेरीत महत्त्वपूर्ण शतके झळकावलेली आहेत.  भारताचा 19 वर्षांखालील स्टार मुशीर खान यानेही उत्तम प्रदर्शन केले आहे.

2017-18 आणि 2018-19 मध्ये रणजी चषक जिंकलेल्या विदर्भाने सर्व विभागांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फलंदाजीत कऊण नायर (616 धावा) आघाडीवर राहिलेला असून ध्रुव शौरे (549 धावा), अक्षय वाडकर (530 धावा), अथर्व तायडे (529 धावा) आणि यश राठोड (456 धावा) यांनीही चमक दाखविलेली आहे. विदर्भाच्या गोलंदाजीत आदित्य सरवटे (40 बळी) आणि आदित्य ठाकरे (33 बळी) हे आघडावर असून यादवलाही सूर मिळालेला आहे.

Advertisement
Tags :

.