मुंबईला विजयासाठी अद्याप 323 धावांची गरज
राठोडचे दीडशतक, मुलानीचे 6 बळी
वृत्तसंस्था/नागपूर
2025 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरुवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर विद्यमान विजेत्या मुंबई संघाला विदर्भकडून निर्णायक विजयासाठी 323 धावांचे आव्हान मिळाले असून त्यांनी दुसऱ्या डावात 3 बाद 83 धावा जमविल्या आहेत. विदर्भचा संघ अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 383 धावा जमविल्यानंतर मुंबईचा पहिला डाव 270 धावांत आटोपला. विदर्भने 113 धावांची भक्कम आघाडी पहिल्या डावात मिळविल्यानंतर त्यांनी दुसऱ्या डावात 292 धावा जमवित मुंबईला विजयासाठी 406 धावांचे कठीण आव्हान दिले. मात्र मुंबईचा दुसरा डाव डळमळीत स्थितीत असून त्यांनी 83 धावांत 3 गडी गमविले आहेत. शुक्रवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी विदर्भला विजयासाठी आणखी 7 गडी बाद करावे लागतील तर मुंबईला 323 धावा कराव्या लागतील. विदर्भने 4 बाद 147 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. विदर्भच्या दुसऱ्या डावात यश राठोडने 151 धावांची दीड शतकी खेळी केली. अक्षय वाडकरने 52 धावा जमविल्या.