मुंबई स्मॅशर्सला पिकलबॉल स्पर्धेचे जेतेपद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंडियन पिकलबॉल लीग स्पर्धेचे अजिंक्यपद मुंबई स्मॅशर्सने पटकाविताना अंतिम सामन्यात हैदराबाद रॉयल्सचा 5-1 असा पराभव केला. या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या लढतीमध्ये मुंबई स्मॅशर्सचा क्यूआंग डुआँगने हैदराबाद रॉयल्सच्या तेजस गुलाटीचा 15-4 असा पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात डुआँग आणि अमोल रामचंदानी या जोडीने हैदराबादचा बेन नेवेल आणि दिव्यांशु कटारिया यांचा 15-10 असा पराभव केला. यामुळे मुंबई स्मॅशर्सने हैदराबाद रॉयल्सवर 2-0 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात हैदराबाद रॉयल्सच्या मेगान फ्युज मुंबई स्मॅशर्सच्या सिंदूर मित्तलचा 15-5 असा पराभव केला. महिला दुहेरीच्या लढतीमध्ये मुंबई स्मॅशर्सच्या अॅलिसन हॅरिस आणि पर्ल अमला साडीवाला यांनी हैदराबादच्या मेगान फ्युज व श्रेया चक्रवर्ती यांचा 15-10 असा पराभव केला. मुंबई स्मॅशर्स संघाने या अंतिम लढतीत हैदराबाद रॉयल्सचा 21-14 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले.