मुंबई, पुणे युनायटेड पिकलबॉल संघ विजयी
वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरु असलेल्या विश्व पिकलबॉल सांघिक लीग स्पर्धेत मुंबईने आपली विजयी घोडदौड कायम राखताना हैदराबाद सुपरस्टार्सचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात पुणे युनायटेडने बेंगळूर जवान्सवर 3-2 असा निसटता विजय मिळवला. या स्पर्धेतील पुणे युनायटेडचा हा पहिला विजय आहे.
मुंबई आणि हैदराबाद सुपरस्टार्स यांच्यातील सामन्यात पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात मुंबईच्या ब्रेंडॉन लेनीने हैदराबाद सुपरस्टार्सच्या मॅक्स फ्रिमनचा 19-17 असा पराभव केला. त्यानंतर महिलांच्या दुहेरीतील सामन्यात मुंबईच्या ग्लौका लेनी आणि केटी मॉरिस यांनी हैदराबाद सुपरस्टार्सच्या अॅव्हा कॅव्हेटो आणि मॅडेलिना ग्रीगोरचा 9-7 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरीत मुंबईच्या किम आणि मयुर पाटील यांनी हैदराबाद सुपरस्टार्सच्या मॅक्स फ्रिमन आणि कॉस्टन यांचा 15-14 असा पराभव केला. या सामन्यानंतर मुंबईने हैदराबाद सुपरस्टार्सवर 3-0 अशी आघाडी घेतली होती. महिलांच्या एकेरीतील सामन्यात मुंबईच्या केवॉनने हैदराबादच्या कॅरोलिनावर 11-8 असा विजय मिळविला. शेवटच्या मिश्र दुहेरीच्या सामन्यात ब्रेंडॉन लेनी आणि ग्लौका लेनी यांनी हैदराबादच्या कॅव्हेटो आणि व्हिटेकर यांचा 14-8 असा पराभव करत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात पुणे युनायटेडने बेंगळूर जवान्सवर 3-2 अशी मात केली. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात पुण्याच्या 17 वर्षीय मॅटिसीकने बेंगळूरच्या जॅक फोस्टरचा 18-15 असा पराभव केला. त्यानंतर महिलांच्या दुहेरीतील सामन्यात बेंगळूर जवान्सच्या मॅकलेन आणि बोरोबिया यांनी पुणे युनायटेडच्या मॉली व साँडर्सवर 28-6 असा एकतर्फी विजय मिळवित आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पुरुष दुहेरीच्या सामन्यात पुणे युनायटेडच्या विलियम सोबेक आणि कापाडिया यांनी बेंगळूर जवान्सच्या जोडीचा 13-8 असा पराभव केला. त्यानंतर बेंगळूर जवान्सने महिला एकेरीच्या सामन्यात विजय मिळविला. बेंगळूरच्या कॅटरीना स्टिव्हर्टने पुण्याच्या ब्रुकी रिव्हेल्टाचा 22-13 असा पराभव केला. दोन्ही संघ यावेळी 2-2 असे बरोबरीत होते. मिश्र दुहेरीच्या पाचव्या आणि शेवटच्या निर्णायक लढतीमध्ये पुण्याच्या मॉली ओडुंगी आणि लुईस लॅव्हेली यांनी बेंगळूर जवान्सच्या मॅक्लेन व फॉस्टर यांचा 20-8 असा पराभव केला. या सामन्यातील पराभवामुळे बेंगळूर जवान्सचे आव्हान संपुष्टात आले.