मुंबई पोलीस जगात भारी !
जागतिक दर्जाचे शहर अशी ख्याती असलेले मुंबई शहर हे सातत्याने ऐनकेन प्रकरणाने प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. मग ते राजकीय हालचाली असो की पोलीस कारवाई असो. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तर ते सातत्याने असल्याचा इतिहास आहे. 1993 साली झालेले साखळी बॉम्बस्फोट असो की 2006 साली झालेले लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट असो की जगाला हादऊन सोडणारा 26/11 चा हल्ला असो. मुंबई शहराला टार्गेट करणे म्हणजे संपूर्ण देशावर निशाणा साधल्यासारखे असल्याचे दहशतवाद्यांनादेखील कळून चुकले आहे. यामुळे अशा सातत्याने लाईमलाईटमध्ये असलेल्या शहराची चारही बाजुने सुरक्षा करणे म्हणजे मोठे अग्निदिव्य असते. मात्र हे शिवधनुष्य अगदी लिलया पद्धतीने मुंबई पोलीस पेलत असल्याने, सर्व जगात मुंबई पोलीस भारी असे म्हटले जाते.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस दलाचे ब्रिदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश.. असा याचा अर्थ होतो. त्याप्रकारे मुंबई पोलीस दल वर्षानुवर्षे आपले कर्तव्य बजावित आहे. मुंबई पोलीस दलाची ख्याती अख्या जगात दुमदुमत असते. दहशतवादी हल्ला असो की अतिशय क्लिष्ट गुन्हा असो, तो मुंबई पोलीस दलाने चुटकीसारखा सोडविल्याचा इतिहास आहे.
आज मुंबई पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठतेमुळेच सामान्य मुंबईकर सुखाची झोप घेत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेले हे मुंबई शहर जगातील व्यावसायिक, मनोरंजन, शैक्षणिक धरोहर असलेले शहर म्हणून ओळखले जाते. संपूर्ण जगाचा संबंध मुंबई शहराशी ऐनकेन प्रकरणाने येत असतो. देशातील अनेक प्रांतातूनच नाही तर जगातील अनेक देशातून अतिशय उत्कंठेपोटी नागरीक मुंबई शहरात येत असतात. काही उद्योगधंद्यांच्या निमित्ताने तर काही पर्यटक म्हणून तर काही पोट भरण्यासाठी येत असतात. या सर्वांना मुंबई सामावून घेत असते. तर दुसरीकडे या सर्वांची सुरक्षा करण्याचे काम मुंबई पोलीस दल करीत आहे. म्हणूनच मुंबई पोलीस जगात भारी! असे म्हटले जाते. याचा प्रत्यय नुकताच येऊन गेला आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात विघ्नहर्त्याचे आगमन झाले होते. सर्व ठिकाणी उत्साहाचे वातावरण होते. तर याच उत्साहाच्या वातावरणाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले होते. त्यातच मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुंबईकडे कुच केली. एकीकडे गणपती बंदोबस्त तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागण्या घेऊन आलेले मनोज जरांगे पाहता तत्काळ सुट्टीवर गेलेल्या पोलिसांना ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिले. मुंबई पोलिसांपुढे मुंबईकरांबरोबरच मनोज जरांगे यांच्या बरोबर आलेल्या आंदोलनकर्त्यांची सुरक्षा महत्त्वाची होती. त्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले होते. अशावेळी मुंबईत कोसळणारा पाऊस, वाहनांची झालेली गर्दी पहिल्या दिवशी अचानक आंदोलक किती येणार याचा न आलेला अंदाज यातून देखील मुंबई पोलिसांनी अतिशय संयमाने आणि शांततेने बंदोबस्त सुऊ ठेवला. आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल मात्र बाप्पाच्या भक्तांना अ]िण आंदोलनकर्त्याला याची झळ पोहचता कामा नये. अशी साठगाठ मुंबई पोलिसांनी स्वत:शी बांधली होती. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण 2 सप्टेंबर रोजी मागे घेतले आणि मुंबई पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पोलिसांना आंदोलकांशी संयमाने वागण्याच्या सूचना दिल्या. त्याचे तंतोतंत पालन दक्षिण मुंबईत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. मराठा आंदोलकांनीही पोलिसांना सहकार्य केले. कुणीही वाद घातला नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत सतत पाच दिवस मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून काम करीत होते. कुणीही घरी गेले नव्हते. त्याचे चीज झाले. मराठ्यांच्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलिसांबरोबरच आंदोलकांनाही द्यावे लागेल. मराठा समाजाचे यापूर्वीचे मुंबईत आलेले मोर्चेही शांततेत पार पडले होते. मराठा समाजाच्या मूक मोर्चाची तर सर्व देशवासीयांनी प्रशंसा केली, परंतु 11
ऑगस्ट 2012 रोजी मुसलमानांनी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाची आठवण आली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. शनिवारचा तो दिवस होता. आसाम आणि म्यानमार येथील दंगलीत मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा दावा करून मुंबईच्या बहुचर्चित रझा अकादमीने निषेधासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. जोगेश्वरीतील बेहराम बाग, ठाणे, मुंब्रा, गोवंडी, देवनार, कुर्ला आदी भागांतील समाजकंटकांनी रझा अकादमीच्या या मोर्चात भाग घेतला होता. त्या वेळी अऊप पटनायक हे मुंबईचे आयुक्त, तर रजनीश शेठ हे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते.
आसाम आणि म्यानमारमधील दंगलीचा निषेध करण्यासाठी रझा अकादमीने मोर्चा आयोजित केला आहे इतकीच माहिती मुंबईच्या गुप्तचर यंत्रणांकडे होती. त्यामुळे या मोर्चाची कुणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फारशी दखल घेतली नव्हती. सर्व मुंबई पोलीस बेसावध होते. त्याचाच फायदा मुसलमानांच्या मोर्चात सामील झालेल्या समाजकंटकांनी घेतला. मुसलमान नेत्यांची आझाद मैदानातील व्यासपीठावरील भाषणे संपल्यावर समाजकंटकांनी आझाद मैदानात हैदोस घालण्यास सुऊवात केली. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ले सुरू केले. पोलीस शिपाई महिलांचे कपडे फाडले. प्रसारमाध्यमांची वाहने, कॅमेरे आणि ओबी
व्हॅन फोडल्या. अचानक हिंसक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी अखेर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात 2 मोर्चेकरी ठार झाले, तर 53 पोलीस जखमी झाले. काही पोलीस आयुष्यातून उठले, अपंग झाले. या हिंसक मोर्चात समाजकंटकांनी सुमारे 10 कोटी ऊपयांचे नुकसान केले. या दंगलप्रकरणी पोलिसांनी 70 जणांना अटक केली, परंतु दंगलीचे कुर्ला मशिदीतून आयोजन करणारा बांगलादेशी मुल्ला काही पोलिसांना शेवटपर्यंत सापडला नाही. अरूप पटनायक यांना मात्र आपले आयुक्तपद गमवावे लागले. तत्कालीन मुख्यमंत्री पफथ्वीराज चव्हाण यांनी अरूप पटनायक यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. सत्यपाल सिंह यांची नियुक्ती केली. अशा या भयानक, हीन, अधम प्रसंगाचे सावट मराठा आंदोलनाच्या वेळी मुंबई पोलिसांवर होते, परंतु सुदैवाने कोणतीही अशुभ घटना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात घडली नाही.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि त्यांचे नेतृत्वाखालील मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने जरांगे यांचे आंदोलन हाताळले. गणेशोत्सवासारखा महाउत्सव अगदी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न होता पार पाडला, त्याला शब्द अपुरे आहेत. म्हणूनच मुंबई पोलीस जगात भारी! जे म्हटले जाते त्याची प्रचिती यादरम्यान येते.
अमोल राऊत