For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

06:58 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement

केकेआरविरुद्ध 24 धावांनी पराभूत : वानखेडेवर तब्बल 12 वर्षानंतर पेकेआरचा मुंबईवर विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

पाच वेळ आयपीएल चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने मुंबईला 24 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना वेंकेटश अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 169 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 145 धावांत ऑलआऊट झाला. विशेष म्हणजे, केकेआरने वानखेडे मैदानावर 12 वर्षांनंतर मुंबईचा पराभव केला. या मैदानावर नाइट रायडर्सचा शेवटचा विजय 2012 मध्ये मुंबईविरुद्ध झाला होता. दरम्यान, 52 चेंडूत 70 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारणाऱ्या वेंकटेश अय्यरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. विजयासह केकेआरचे 14 गुण झाले असून गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानी आहेत.

Advertisement

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 170 धावांच्या आव्हानाचा सामना करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. मुंबईचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. रोहित शर्मा 11 धावा, ईशान किशन 13 धावा आणि नमन धीर फक्त 11 धावा काढून तंबूत परतले. तिलक वर्मा व नेहल वढेरा, कर्णधार हार्दिक पंड्या यांनही हजेरी लावण्याचे काम केल्याने मुंबईची 6 बाद 71 अशी स्थिती झाली होती. एका बाजूला विकेट जात असताना दुसऱ्या बाजूला सूर्याने शानदार फलंदाजी केली. सूर्याने 35 चेंडूमध्ये 56 धावा केल्या. यामध्ये दोन षटकार आणि सहा चौकाराचा समावेश होता. सूर्या मैदानात असेपर्यंत मुंबईला विजयाच्या आशा होत्या पण 16 व्या षटकांत रसेलने त्याला बाद करत केकेआरला मोठे यश मिळवून दिले. सूर्या बाद झाल्यानंतर टीम डेव्हिडने 24 धावा केल्या तर इतर फलंदाजांनीही निराशा केल्याने मुंबईचा डाव 18.5 षटकांत 145 धावांवर आटोपला. केकेआरकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार गडी बाद केले.

केकेआर प्ले ऑफच्या उंबरठ्यावर

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकचा हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. नुवान तुषाराने सुरुवातीलाच केकेआरला जोरदार धक्के दिले. आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. फॉर्मात असलेला फिल सॉल्ट आणि सुनील नरेनला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. सॉल्ट फक्त पाच धावा काढून बाद झाला. तर सुनिल नरेनला फक्त आठ धावांचं योगदान देता आले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रघुवंशी 13 धावा काढून बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरलाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 6 धावांवर त्याला तुषाराने तंबूचा रस्ता दाखवला.

वेंकेटश अय्यरची अर्धशतकी खेळी

अय्यर बाद झाल्यानंतर स्टार खेळाडू रिंकू सिंहचा अडथळा पियुष चावलाने दूर केला. रिंकूने 9 धावा केल्या. यावेळी केकेआरची 5 बाद 57 अशी स्थिती होती. यावेळी मनिष पांडे आणि वेंकटेश अय्यर यांनी कोलकात्याच्या डावाला आकार दिला. या दोघांनी 83 धावांची शानदार भागिदारी करत संघाचे शतक फलकावर लावले. हार्दिक पंड्याने मनिष पांडेला बाद करत ही जोडी फोडली. मनिषने 31 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकाराचा समावेश होता. मनिष बाद झाल्यानंतर इतर पेकेआरचे फलंदाज फ्लॉप ठरले. आंद्रे रसेल, रमणदीप आणि मिचेल स्टार्क स्वस्तात तंबूत परतले. मिचेल स्टार्कला खातेही उघडता आले नाही. रसेल सात धावा काढून धावबाद झाला, तर रमणदीपला बुमराहने तंबूत धाडले. एका बाजूला विकेड पडत असताना वेंकटेश अय्यरने केकेआरच्या डावाला आकार दिला. त्याने 52 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह 70 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. अय्यरच्या या खेळीच्या जोरावर केकेआरला 169 धावापर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकात बुमराहने त्याला बाद करत केकेआरचा डाव संपुष्टात आणला. मुंबईकडून बुमराहने 18 धावांत 3 तर तुषाराने 42 धावांत 3 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

केकेआर 19.5 षटकांत सर्वबाद 169 (फिल सॉल्ट 5, सुनील नरेन 8, रघुवंशी 13, वेंकेटश अय्यर 52 चेंडूत 70, रिंकू सिंग 9, मनीष पांडे 31 चेंडूत 42, जसप्रीत बुमराह व नुवान तुषारा प्रत्येकी तीन बळी, हार्दिक पंड्या 2 तर पियुष चावला 1 बळी).

मुंबई इंडियन्स 18.5 षटकांत सर्वबाद 145 (इशान किशन 13, रोहित शर्मा 11, सुर्यकुमार यादव 35 चेंडूत 56, टीम डेव्हिड 24, मिचेल स्टार्क 4 बळी, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन व आंद्रे रसेल प्रत्येकी 2 बळी).

पियुष चावलाने मोडला ड्वेन ब्राव्होचा विक्रम

मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियुष चावलाने केकेआरविरुद्ध सामन्यात एक विकेट घेतली. यासह त्याने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. पीयूष चावलाने आयपीएलमध्ये 184 विकेटेस पूर्ण केल्या. ब्रॉव्होने आयपीएलमध्ये 183 विकेट्स घेतल्या आहेत. यासह पियुष चावला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वलस्थानी युजवेंद्र चहल आहे, ज्याने आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

मुंबई प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर

करो या मरोच्या सामन्यात केकेआरने मुंबईचा 24 धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला यंदाच्या हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. यंदाच्या हंगामात आव्हान संपणारा मुंबईचा पहिलाच संघ ठरला आहे. मुंबईचे आत्तापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यात फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला असून 8 सामने गमावले आहेत. मुंबईच्या खात्यावर सहा गुण आहेत. मुंबईचे आता तीन सामने बाकी असून उर्वरित तीनही सामने जिंकले तरी त्यांचे गुण 12 होतात. पण, सध्याच्या घडीला इतर संघाची परिस्थिती पाहता मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

Advertisement
Tags :

.