मुंबई-लखनौ आज महत्त्वपूर्ण लढतीत आमनेसामने
वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन प्रीमियर लीगच्या आज रविवारी येथे होणाऱ्या सामन्यात धोकादायक लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध मुंबई इंडियन्स आपला विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या एमआय आणि एलएसजी या दोघांचेही 10 गुण झाले आहेत आणि त्यांच्यात फक्त नेट रन रेटचा फरक आहे. त्यांनी आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये प्रत्येकी पाच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.
वानखेडे स्टेडियमवर वर्चस्वासाठी हे दोन्ही संघ लढतील आणि मुंबईची सततची उष्णता आणि आर्द्रता प्रतिकूल परिस्थितीत खेळण्याच्या खेळाडूंच्या तयारीची चाचणी घेण्यात मोलाची भूमिका बजावेल. पाहुण्यांसाठी उणे 0.054 नेट रन रेट हा एक असा घटक आहे जो ते सुधारण्यास उत्सुक असतील. त्याचबरोबर कर्णधार रिषभ पंत मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होईल, अशी आशा त्यांना असेल. पंतने या हंगामात आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये फक्त 106 धावा केल्या आहेत.
पंतच्या पाहुण्या संघासमोर आज आव्हान मोठे आणि वेगळे असेल. कारण यजमान मुंबई इंडियन्स येथील परिस्थितीशी परिचित आहेत आणि सलग चार विजय मिळवून गुणतालिकेच्या वरच्या भागात पोहोचण्यात ते यशस्वी झाले आहेत. मुंबई योग्य वेळी शिखरावर पोहोचत आहे आणि सर्व बाजूंनी चांगली कामगिरी करत आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि अगदी हार्दिक पंड्यासारखे मुख्य खेळाडू भविष्यात मुंबईच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी खूप मोठा धोका निर्माण करतील. रोहितने चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादविऊद्ध दोन स्फोटक अर्धशतके झळकावून आपण फॉर्मात आल्याचे दाखवून दिले आहे.
एलएसजीसाठी परदेशी स्टार निकोलस पूरन (377 धावा), मिशेल मार्श (344) आणि एडन मार्करम (326) यांनी त्यांच्या यशाचा पाया रचला आहे आणि या तिघांवर ते मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. एलएसजीची गोलंदाजी कागदावर भीतीदायक नाही, परंतु मार्ग शोधण्यात ते पुरेसे कुशल आहेत. एलएसजीसाठी उशिरा करारबद्ध झालेला स्थानिक खेळाडू शार्दुल ठाकूरने आतापर्यंत सर्वाधिक बळी (12) घेतले आहेत. रवी बिश्नोईने जास्त बळी मिळविलेले नाहीत, परंतु दिग्वेश राठीने या आयपीएलमध्ये चांगली छाप पाडली आहे.
संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिशेल सॅन्टनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.
लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, मयंक यादव, रवी बिश्नोई.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.