मुंबई - लखनौचे आज विजयाने मोहीम संपविण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था /मुंबई
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज शुक्रवारी येथील वानखेडे स्टेडियमवर लढत होणार असून दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे विजय मिळवून आपली मोहीम संपवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. मुंबई इंडियन्स फार पूर्वीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले होते. लखनौने येथे मागील आयपीएल सामना मोठ्या फरकाने जिंकलेला असला, तरीही अंतिम चार संघांमध्ये त्यांना स्थान मिळण्याची शक्यता फारच अंधुक आहे. सलग तीन पराभवांमुळे एलएसजीला महत्त्वाच्या गुणांनाच मुकावे लागले नाही, तर त्यांची निव्वळ धावसरासरीही खराब झाली आहे. केकेआरविरुद्ध त्यांना 98 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने 10 गडी राखून पराभव केला, तर दिल्ली कॅपिटल्सने 19 धावांनी पराभूत केले. त्यामुळे मागील वर्षी अंतिम चार संघांमध्ये प्रवेश केलेल्या लखनौची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. सातव्या क्रमांकावर असलेल्या ‘एलएसजी’ची धावसरासरी उणे 0.787 अशी असून त्यांना पुन्हा शर्यतीत आणण्याइतकी त्यात लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही. कारण सहाव्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची धावसरासरी 0.387 अशी चांगली आहे. दुसरीकडे आतापर्यंत 13 सामन्यांमधून केवळ चार विजय मिळवू शकलेला मुंबई इंडियन्स संघ आज जिंकल्यास 10 गुणांवर पोहोचेल, ज्यामुळे त्यांना शेवटचे स्थान टाळण्यास मदत होऊ शकते. नवीन कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली त्यांची कामगिरी अगदीच सुमार झाली असून त्यांची फलंदाजी अपयशी ठरली आहे तसेच जसप्रीत बुमराह (13 सामन्यांत 20 बळी) वगळता इतर गोलंदाज चमक दाखवू शकलेले नाहीत. या सामन्यातही लक्ष पंड्या, रोहित शर्मा, बुमराह आणि सूर्यकुमार यादव यासारख्या टी-20 विश्वचषकासाठी निवड झालेल्या खेळाडूंवर असेल.
- मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका , मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवलिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, हार्विक देसाई, नेहल वढेरा, ल्यूक वूड.
- लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर, मणिमारन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, अर्शद खान, कृष्णप्पा गौतम, अमित मिश्रा, काइल मेयर्स, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, युद्धवीरसिंह चरक, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप.