मुंबईला 585 धावांची आघाडी
सिद्धेश लाड, आकाश आनंद, मुलानी यांची शतके
वृत्तसंस्था/मुंबई
2025 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या इलाईट गट अ मधील सामन्यात विद्यमान विजेत्या मुंबईने आपला पहिला डाव 7 बाद 671 धावांवर घोषित करुन मेघालयावर 585 धावांची भक्कम आघाडी मिळविली. मुंबईच्या डावामध्ये सिद्धेश लाड, आकाश आनंद आणि मुलानी यांनी शतके झळकविली. रहाणेचे शतक 4 धावांनी हुकले. शेडगे, शार्दुल ठाकुर यांनी अर्धशतके नोंदविली.
या सामन्यात मेघालयाचा पहिला डाव 86 धावांवर समाप्त झाला. दिवसअखेर मेघालयाने दुसऱ्या डावात 2 बाद 27 धावा जमविल्या. चालु वर्षीच्या रणजी हंगामातील अजिंक्य रहाणेचे पहिले शतक केवळ 4 धावांनी हुकले. सिद्धेश लाडने 1 षटकार आणि 17 चौकारांसह 145 धावा जमविताना रहाणे समवेत 196 धावांची भागिदारी केली. लाड आणि आकाश आनंद यांनी चौथ्या गड्यासाठी 87 धावांची तसेच शेडगे आणि आनंद यांनी पाचव्या गड्यासाठी 123 धावांची भागिदारी केली. शार्दुल ठाकुरने तुफान फटकेबाजी करताना 42 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह 84 धावा झोडपताना मुलानी समवेत सातव्या गड्यासाठी 156 धावांची भर घातली. मुलानीने 86 चेंडूत शतक झळकविल्यानंतर मुंबईने डावाची घोषणा केली. मेघालय संघातील फुकेनने तीन गडी बाद केले.
महाराष्ट्र सुस्थितीत
सोलापूरमध्ये सुरू असलेल्या रणजी सामन्यात त्रिपुरा विरुद्ध खेळताना महाराष्ट्राने 72 षटकात 3 बाद 235 धावा जमविल्या. सिद्धेश वीर 93 धावांवर खेळत असून यश क्षीरसागरने 71 धावा जमविल्या. तत्पूर्वी त्रिपुराने पहिल्या डावात 270 धावा केल्या होत्या.
जम्मू काश्मिरची पकड
बडोदा येथे सुरू असलेल्या अ गटातील सामन्यात जम्मू काश्मिर संघाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. या सामन्यात जम्मू काश्मिरने पहिल्या डावात 246 धावा जमविल्यानंतर बडोदा संघाचा पहिला डाव 166 धावांत आटोपला. जम्मू काश्मिरच्या अबिद मुस्ताक आणि खजुरिया यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. जम्मू काश्मिरने पहिल्या डावात 80 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी 41 षटकात 1 बाद 125 धावा जमवित बडोदा संघावर 205 धावांची बडत मिळविली आहे. गेल्या आठवड्यात जम्मू काश्मिर संघाने बलाढ्या मुंबईला पराभवचा धक्का देत स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
कोहलीची पुन्हा निराशा
नवी दिल्लीत सुरू असलेल्या ड इलाईट गटातील रणजी सामन्यात दिल्ली संघाने रेल्वे संघावर 96 धावांची आघाडी मिळविली. दिल्लीचा कर्णधार आयुष बडोणीने 99 धावा झळकविल्या. सुमित माथूर 78 धावांवर खेळत आहे. रेल्वेचा पहिला डाव 241 धावांत आटोपल्यानंतर दिल्लीने पहिल्या डावात 7 बाद 334 धावा जमविल्या. मात्र दिल्लीकडून खेळणारा विराट कोहली केवळ 6 धावावर बाद झाला.