मुंबईला 415 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर मुंबई संघाने 415 धावांची भक्कम आघाडी बडोदा संघावर मिळविली आहे. मुंबईने दिवसअखेर दुसऱ्या डावात 9 बाद 379 धावा जमविल्या. मुंबईच्या दुसऱ्या डावात सलामीच्या हार्दिक तमोरेने शानदार शतक तर पृथ्वी शॉ आणि मुलानी यांनी अर्धशतके झळकविली.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 384 धावा जमविल्या. मुशिर खानने नाबाद द्विशतक (203), तमोरेने अर्धशतक (57), शॉने 33, शेडगेने 20 धावा जमविल्या. बडोदा संघातील भार्गव भटने 112 धावात 7 गडी तर निनाद रतवाने 3 गडी बाद केले. त्यानंतर बडोदा संघाने पहिल्या डावात 348 धावा जमविल्या. त्यांच्या पहिल्या डावात रावत आणि कर्णधार सोळंकी यांनी शतके झळकविली. रावतने 124 तर सोळंकीने 136 धावा जमविल्या. मुंबईतर्फे मुलानीने 4 तर तुषार देशपांडे व कोटियान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबईने पहिल्या डावात 36 धावांची आघाडी घेतली.
मुंबईने 1 बाद 21 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी दिवसअखेर दुसऱ्या डावात 102 षटकात 9 बाद 379 धावा जमवित बडोदा संघावर 415 धावांची भक्कम आघाडी मिळविली. मुंबईच्या डावामध्ये सलामीच्या तमोरेने 10 चौकारांसह 114, पृथ्वी शॉने 2 षटकार आणि 10 चौकारांसह 87, मुलानीने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 54, मुशिर खानने 5 चौकारांसह 33 धावा जमविल्या. कोटियान 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 32 तर देशपांडे 2 चौकारांसह नाबाद 23 धावावर खेळत आहेत. बडोदा संघातर्फे भार्गव भटने 142 धावांत 7 गडी बाद केले. या सामन्यात भार्गव भटने एकूण 14 बळी मिळविले आहेत.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव 384, बडोदा प. डाव 348, मुंबई दु. डाव 9 बाद 379 (तेमोरे 114, शॉ 87, मुलानी 54, मुशिर खान 33, कोटियान खेळत आहे 32, देशपांडे खेळत आहे 23, भार्गव भट 7-142).