For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! पॅडल

06:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   पॅडल
Advertisement

पॅडल...जगभरात 3 कोटींहून अधिक खेळाडूंसह वेगानं वाढणारा, लोकप्रिय होत चाललेला खेळ...डेव्हिड बेकहॅम, सेरेना विल्यम्स आणि अगदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सुद्धा स्वत:ला त्याचे चाहते मानतात...सुट्टी साजरी करताना कंटाळा दूर करण्यासाठी काय करावं या विचारातून एका जोडप्यानं ज्याचा शोध लावला असा हा खेळ...पण त्यानं जी झेप घेतलीय ती निश्चितच उल्लेखनीय...

Advertisement

  • 1969 मध्ये मेक्सिकन बंदर शहर अकापुल्कोच्या फॅशनेबल लास ब्रिसास उपनगरात सुट्टी सत्कारणी लावत असताना मॉडेल व्हिवियाना कॉर्क्युएरा आणि पती एन्रिक यांनी हा खेळ जन्मास घातला. तो पुढं इतका लोकप्रिय होईल अशी त्यांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसेल..वेळ घालविण्यासाठी या धनाढ्या जोडप्यानं भिंतीवर बॉल मारण्यास सुऊवात केली आणि व्हिवियाना पटकन या खेळाच्या प्राथमिक स्वरुपाच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिनं पतीकडे आग्रह धरला तो ‘पॅडल कोर्ट’ साकारण्याचा. हीच खेळाची सुरुवात...
  • पॅडल हा असा हा एक खेळ जो खेळायला मजा येते अन् तो सर्व वयोगटांतील खेळाडूंसाठी उपयुक्त. कारण त्याची वेगवान गती अन् दुसरी गोष्ट म्हणजे तो शिकण्यास अत्यंत सोपा...
  • हा खेळ म्हणजे टेनिस आणि स्क्वॅश यांचं मिश्रण. सहसा तो काचेच्या नि धातूच्या भिंतींनी वेढलेल्या बंद कोर्टवर दुहेरी स्वरुपात खेळला जातो. त्याचं कोर्ट हे टेनिस कोर्टच्या एक तृतीयांश इतक्या आकाराचं...
  • टेनिसमध्ये जितकं सामर्थ्य, तंत्र आणि सर्व्हिस वर्चस्व गाजवते तितकं ते या खेळात दिसत नाही. म्हणूनच पुऊष, महिला व तऊण-तरुणींनी एकत्र खेळण्याच्या दृष्टीनं हा एक आदर्श प्रकार...खेळण्याचं कौशल्य यात महत्त्वाचं, कारण निव्वळ ताकदीच्या जोरावर गुण मिळविण्याऐवजी इथं जास्त काम येते ती रणनीती...
  • या खेळात चेंडू कोणत्याही भिंतीला आदळून आला, तरी चालू शकतो. परंतु तो हाणून परतण्यापूर्वी त्याचा टर्फवर फक्त एकदाच टप्पा पडलेला असणं आवश्यक. जेव्हा चेंडू प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात दोनदा टप्पा घेतो तेव्हा गुण खात्यात जमा होतो...
  • पॅडल रॅकेट हे टेनिस रॅकेटच्या तुलनेत छोटं, त्याला जाळी नसते आणि छिद्रांसह ‘इलेस्टिक’ पृष्ठभाग असतो. त्यात हलका टेनिस चेंडू वापरला जातो आणि सर्व्हिस ही ‘अंडरआर्म’ पद्धतीनं करायची असते...चेंडू आजुबाजूच्या काचेच्या भिंतींवर आदळण्यापूर्वी किंवा नंतर खेळण्याची मुभा असल्यानं पारंपरिक टेनिसपेक्षा वेगळा आयाम या खेळाला मिळालाय. यामुळं टेनिसमधील सामन्यापेक्षा दीर्घकाळ रॅली पाहायला मिळतात...
  • पॅडल कोर्ट हे 20 मीटर लांब आणि 10 मीटर ऊंद असतं. मागील भिंती 3 मीटर उंचीपर्यंत काचेच्या, तर बाजूच्या काचेच्या भिंती 4 मीटरपर्यंत असतात. भिंती काचेच्या किंवा इतर घन पदार्थ म्हणजे अगदी काँक्रीटसारख्या सामग्रीचा वापर करून बनविल्या जाऊ शकतात. उर्वरित कोर्ट 4 मीटर उंचीपर्यंत ‘मॅटालिक मॅश’ वापरून बंद केलं जातं...
  • मैदानाच्या मध्यभागी एक जाळी असते, जी कोर्टला दोन भागांमध्ये विभागते. मैदान मध्यभागी एका रेषेनं विभागलेलं असतं आणि मागील भिंतीपासून तीन मीटर अंतरावरील दुसरी रेषा ‘सर्व्हिस एरिया’ दर्शविते...यातील गुण नोंदविण्याची पद्धत आणि नियम हे टेनिससारखेच...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.