मुंबई इंडियन्सचा 9 धावांनी विजय
गुजरात जायंट्स पराभूत, कर्णधार कौरचे अर्धशतक
वृत्तसंस्था / मुंबई
महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान मुंबई इंडियन्स महिला संघाने गुजरात जायंट्सचा 9 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या कर्णधार हरमनप्रित कौरने शानदार शतक झळकविले तर गुजरात जायंट्सच्या फुलमालीचे अर्धशतक वाया गेले.
या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 बाद 179 धावा जमवित गुजरात जायंट्स संघाला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले. पण गुजरात जायंट्सचा डाव 20 षटकात 9 बाद 170 धावांवर आटोपल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
या स्पर्धेतील हा 19 वा सामना असून गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स 8 सामन्यातून 10 गुणांसह पहिल्या, मुंबई इंडियन्स 7 सामन्यांतून 10 गुणांसह दुसऱ्या, गुजरात जायंट्स 8 सामन्यांतून 8 गुणांसह तिसऱ्या, युपी वॉरियर्स 8 सामन्यांतून 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीने 7 सामन्यांतून 4 गुणांसह शेवटचे स्थान मिळविल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
मुंबई इंडियन्सच्या डावात हरमनप्रित कौरने 33 चेंडूत 9 चौकारांसह 54, मॅथ्युजने 22 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 27, अॅमेलिया केरने 9 चेंडूत 1 चौकारांसह 5, नॅट सिव्हेर ब्रंटने 31 चेंडूत 6 चौकारांसह 38, अमनज्योत कौरने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 27, सजीवन सजनाने 6 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 11 तर भाटियाने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. मुंबईच्या डावामध्ये 4 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेच्या 6 षटकात 44 धावा जमविताना 1 गडी गमविला. मुंबई इंडियन्सचे अर्धशतक 48 चेंडूत, शतक 79 चेंडूत तर दीड शतक 107 चेंडूत नोंदविले गेले. हरमनप्रित कौरने आपले अर्धशतक 8 चौकारांच्या मदतीने 31 चेंडूत पूर्ण केले. हरमनप्रित कौर आणि नॅट सिव्हेर ब्रंट यांनी तिसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागिदारी केली. गुजरात जायंट्सतर्फे कंवर, गौतम, प्रिमा मिश्रा आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सच्या अचूक गोलंदाजीसमोर गुजरातची एकवेळ स्थिती 6 बाद 92 अशी केविलवाणी होती. पण त्यानंतर भारती फुलमालीने 25 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह 61 धावा झळकविल्याने गुजरातला पुन्हा विजयाची आशा निर्माण झाली होती. पण गुजरात जायंट्सला 20 षटकात 170 धावांपर्यंत मजल मारता आली. बेथ मुनीने 1 चौकारांसह 7, के. गौतमने 2 चौकारांसह 10, देवोलने 17 चेंडूत 5 चौकारांसह 24, लिचफिल्डने 4 चौकारांसह 22, डॉटीनने 1 चौकारांसह 10, शेखने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 18, कंवरने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सतर्फे अॅमेलिया केरने 34 धावांत 3 तर शबनीम इस्माईल आणि मॅथ्युज यांनी प्रत्येकी 2 तर गुप्ताने 1 गडी बाद केला. गुजरातच्या डावामध्ये 5 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले.
गुजरातने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 40 धावा जमविताना 2 गडी गमविले. गुजरातचे अर्धशतक 44 चेंडूत, शतक 84 चेंडूत तर दीड शतक 105 चेंडूत नोंदविले गेले. फुलमालीने 22 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकात 6 बाद 179 (हरमनप्रित कौर 54, नॅट सिव्हेर ब्रंट 38, मॅथ्युज 27, अमनज्योत कौर 27, केर 5, सजना नाबाद 11, भाटिया 13, कंवर, गौतम, मिश्रा, गार्डनर प्रत्येकी 1 बळी), गुजरात जायंट्स 20 षटकात 9 बाद 170 (फुलमाली 61, लिचफिल्ड 22, डॉटीन 10, शेख 18, कवंर 10, देवोल 24, गौतम 10, मुनी 7, अवांतर 6, अॅमेलिया केर 3-34, मॅथ्युज 2-38, इस्माईल 2-17, गुप्ता 1-18)