मुंबई इंडियन्स महिलांचा दणदणीत विजय
सहा गुणांसह अग्रस्थानी, सामनावीर सिव्हर-ब्रंटची अष्टपैलू चमक, मॅथ्यूजचे अर्धशतक, हॅरिसची खेळी वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
नॅट सिव्हर ब्रंटच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर मुंबई इंडियन्स महिला संघाने येथे झालेल्या डब्ल्यूपीएलमधील सामन्यात यूपी वॉरियर्सचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. नाबाद 75 धावा व 18 धावांत 3 बळी टिपणाऱ्या नॅट सिव्हर ब्रंटला सामनावीराचा बहुमान मिळाला. मुंबईचा हा चार सामन्यातील तिसरा विजय असून 6 गुणांसह ते अग्रस्थानी पोहोचले आहेत. दिल्लीचेही 6 गुण झाले आहेत. पण त्यांचा नेट रनरेट कमी असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
मुंबई इंडियन्सकडून फलंदाजी मिळाल्यावर यूपी वॉरियर्सच्या फलंदाजांना भेदक माऱ्यापुढे मोठी धावसंख्या काढता आली नाही. फक्त ग्रेस हॅरिसने 26 चेंडूत 45 धावा फटकावल्यामुळे त्यांना 20 षटकांत 9 बाद 142 धावांपर्यंत मजल मारता आली. हॅरिसने आक्रमक खेळ करीत 6 चौकार, 2 षटकार ठोकले. तिने वृंदा दिनेशसह दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची भागीदारी केली, तेव्हा ते मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते. पण सिव्हर ब्रंट, संस्कृती गुप्ता यांनी भेदक मारा करीत सामना आपल्या बाजूने फिरविला. गुप्ताने 2 बळी टिपले. तर शबनिम इस्माईलनेही 2 बळी टिपले. याशिवाय अमेलिया केर व हेली मॅथ्यूज यांनी एकेक बळी मिळविले. श्वेता सेहरावतने 19, उमा छेत्रीने नाबाद 13 धावा केल्या.
त्यानंतर मुंबई इंडियन्सने चौथ्याच षटकात यास्तिका भाटियाला (0) गमविले असले तरी मॅथ्यूज व ब्रंट यांनी वॉरियर्सचा मारा चोपून काढत 17 षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या दोघींनी दुसऱ्या गड्यासाठी 133 धावांची भागीदारी केली. मॅथ्यूज 4 धावांची गरज असताना बाद झाली. तिने 50 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 59 धावा फटकावल्या तर सिव्हर ब्रंट 44 चेंडूत 13 चौकार ठोकत 75 धावांवर नाबाद राहिली. कर्णधार हरमनप्रीत कौरने विजयी चौकार ठोकत सामना संपवला. मुंबईने 2 बाद 143 धावा जमविल्या. सोफी एक्लेस्टोन व दीप्ती शर्मा यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : यूपी वॉरियर्स महिला 20 षटकांत 9 बाद 142 : ग्रेस हॅरिस 26 चेंडूत 45, दिनेश वृंदा 30 चेंडूत 33, सेहरावत 19, उमा छेत्री नाबाद 13, अवांतर 8, नॅट सिव्हर ब्रंट 3-18, शबनिम इस्माईल 2-33, संस्कृती गुप्ता 2-11, अमेलिया केर 1-24, मॅथ्यूज 1-38.
मुंबई इंडियन्स महिला 17 षटकांत 2 बाद 143 : हेली मॅथ्यूज 50 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारासह 59, सिव्हर ब्रंट 44 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 75, हरमनप्रीत नाबाद 4, अवांतर 5. एक्लेस्टोन 1-29, दीप्ती शर्मा 1-25.