For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई इंडियन्सचा विजयी ‘चौकार’

06:58 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबई इंडियन्सचा विजयी ‘चौकार’
Advertisement

हैदराबादवर 7 गडी राखून विजय : रोहित शर्माची 70 धावांची खेळी : सामनावीर ट्रेंट बोल्टचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सलग चार सामने जिंकत जोरदार कमबॅक केले आहे. येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने सनरायजर्स हैदराबादला 7 विकेटने पराभूत केले. रोहित शर्माने 70 आणि सूर्यकुमार यादवने 40 धावा करत मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, सलग चौथ्या विजयासह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईंने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 सामने जिंकले आहेत.

Advertisement

हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 144 धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीवीर रायन रिकेल्टन हा लवकर बाद झाला, त्याने 11 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेला विल जॅक्सनेही आक्रमक खेळताना 19 चेंडूत 22 धावा केल्या. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर एका बाजूने विकेट्स पडत असल्या तरी रोहित शर्मा मात्र यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत राहिला. रोहितने यावेळी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सचा चांगलाच समाचार घेतला. दमदार फटकेबाजी करताना त्याने यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने 46 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारासह 70 धावांची खेळी साकारली. विजयाच्या उंबरठ्यावर असताना रोहितला इशान मलिंगाने बाद केले. यानंतर सूर्याने मुंबईला 15.4 षटकांतच विजय मिळवून दिला. सूर्याने 19 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 40 धावा केल्या.

हैदराबादचे सपशेल लोटांगण

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. हैदराबादचा निम्मा संघ 35 धावांमध्ये तंबूत परतला होता. यानंतर हेन्रिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांनी 99 धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8  बाद 143  धावा केल्या. क्लासेनने सर्वाधिक 44 बॉलमध्ये 71 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तर अभिनव मनोहरने 43 धावांचे योगदान दिले.  या दोघांशिवाय अनिकेत वर्माने 12 धावा केल्या. हैदराबादचे इतर खेळाडू दोन अंकी धावसंख्या देखील करु शकले नाहीत. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 4  विकेट घेतल्या. तर, दीपक चाहरने 2 तर बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 8 बाद 143 (ट्रेव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 8, इशान किशन 1, हेन्रिक क्लासेन 44 चेंडूत 71, अभिनव मनोहर 43, ट्रेंट बोल्ट 26 धावांत 4 बळी, दीपक चहर 2 बळी, बुमराह व हार्दिक प्रत्येकी एक बळी)

मुंबई इंडियन्स 15.4 षटकांत 3 बाद 146 (रिकेल्टन 11, रोहित शर्मा 46 चेंडूत 70, विल जॅक्स 22, सूर्यकुमार यादव 19 चेंडूत नाबाद 40, तिलक वर्मा नाबाद 2, उनादकट, मलिंगा व अन्सारी प्रत्येकी एक बळी).

हैदराबादची निराशा, प्ले ऑफच्या आशा धुसर

सनरायजर्स हैदराबादने गेल्या आयपीएलमध्ये फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादला सूर गवसलेला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांना केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. हैदराबादने दोन्ही सामने होम ग्राऊंडवर जिंकले आहेत. अर्थात, यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांनी आतापर्यंत एकूण 8 मॅच खेळल्या असून त्यापैकी 6 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. सलग पराभवामुळे प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा धुसर आहेत.

Advertisement
Tags :

.