For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा चषकाचा मानकरी

06:58 AM Mar 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा चषकाचा मानकरी
Advertisement

दिल्ली कॅपिटल्स पराभूत, कौरचे अर्धशतक, ब्रंटची अष्टपैलु कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव करत चषकावर आपले दुसऱ्यांदा नाव कोरले. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सने सलग तीनवेळा अंतिम फेरी गाठली. पण त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागल्याने ते या स्पर्धेतील चोकर्स ठरले. शनिवारचा हा अंतिम सामना पाहण्यासाठी शौकिनांची उपस्थिती भरगच्च झाली होती. दिल्लीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईने 20 षटकात 7 बाद 149 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 9 बाद 141 धावा जमविल्या.

Advertisement

मुंबईच्या डावामध्ये कर्णधार हरमनप्रित कौरने कप्तानी खेळी करताना 44 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 66 धावा जमविताना नॅट सिव्हेर ब्रंट समवेत तिसऱ्या गड्यासाठी 89 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. ब्रंटने 28 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. दिल्लीच्या गोलंदाजांसमोर मुंबई इंडियन्सचे इतर फलंदाज अधिक धावा जमवू शकले नाही. मॅथ्युजने 3, भाटियाने 1 चौकारासह 8, अॅमेलिया केरने 2 केल्या. अमनज्योत कौरने 2 चौकारांसह नाबाद 14 तर कमलिनीने 1 षटकारासह 10 आणि गुप्ताने 1 चौकारासह नाबाद 8 धावा केल्या. मुंबईचे अर्धशतक 58 चेंडूत, शतक 87 चेंडूत फलकावर लागले. हरमनप्रितने 33 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकात मुंबईने 20 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकाअखेर मुंबईची स्थिती 2 बाद 52 अशी होती. मुंबईच्या डावात 3 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे जोनासेन आणि श्री चरणी व कॅपब् यांनी प्रत्येकी दोन तर सदरलँडने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावामध्ये कॅपने एकाकी लढत देत 26 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 40 धावा जमविल्या. कॅप मैदान असेपर्यंत दिल्लीला विजयाची आशा वाटत होती. पण ती बाद झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेतेपदाने हुलकावणी दिली. रॉड्रिग्जने 21 चेंडूत 4 चौकारांसह 30, निकीप्रसादने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 23 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 25, जोनासेनने 2 चौकारांसह 13, लेनिंगने 2 चौकारांसह 13 धावा केल्या. दिल्लीने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 37 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकामध्ये दिल्लीची स्थिती 5 बाद 66 अशी होती. दिल्लीचे अर्धशतक 53 चेंडूत तर शतक 92 चेंडूत नोंदविले गेले. दिल्लीच्या डावात 3 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे नॅट सिव्हेर ब्रंटने 30 धावांत 3 तर अॅमेलिया केरने 25 धावांत 2 तसेच शबनीम इस्माईल, मॅथ्युज व इशाकी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

या स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने 2023 साली जेतेपद पटकाविले होते. 2024 साली आरसीबीने चषकावर आपले नाव पहिल्यांदाच कोरले. दरम्यान 2025 मधील या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने या चषकावर आपले दुसऱ्यांदा नाव कोरले असून दिल्ली कॅपिटल्सला मात्र तिन्ही वेळा अंतिम फेरी गाठूनही जेतेपदाने हुलकावणी दिली.

संक्षिप्त धावफलक: मुंबई इंडियन्स 20 षटकात 7 बाद 149 (हरमनप्रित कौर 66, नॅट सिव्हेर ब्रंट 30, अमनज्योत कौर नाबाद 14, कमलिनी 10, गुप्ता नाबाद 8, अवांतर 8, कॅप, जोनासेन, श्रीचरणी प्रत्येकी 2 बळी, सदरलँड 1-29), दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 9 बाद 141 (रॉड्रिग्ज 30, कॅप 40, निकी प्रसाद नाबाद 25, जोनासेन 13, लेनिंग 13, अवांतर 2, ब्रंट 3-30, केर 2-25, शबनीम इस्माईल, मॅथ्युज, इशाकी प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.