For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई इंडियन्सचा थरारक विजय

06:55 AM Feb 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबई इंडियन्सचा थरारक विजय
Advertisement

आरसीबी 4 गड्यांनी पराभूत, अष्टपैलू अमनज्योत कौर ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था / बेंगळूर

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात अमनज्योत कौरची अष्टपैलू कामगिरी तसेच कर्णधार हरमनप्रित कौरच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी येथे एक चेंडू बाकी असताना आरसीबीचा 4 गड्यांनी पराभव केला. 2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत आता मुंबई इंडियन्सने आपला सलग दुसरा विजय नोंदवित गुणतक्त्यात 4 गुणासह दुसरे स्थान मिळविले आहे. तर आरसीबीचा हा पहिला पराभव असून ते 4 गुणांसह तसेच सरस धावसरासरीच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहेत.

Advertisement

शुक्रवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला (आरसीबी) प्रथम फलंदाजी दिली. आरसीबीने 20 षटकात 7 बाद 167 धावा जमवित मुंबई इंडियन्सला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले. पण मुंबई इंडियन्सने 19.5 षटकात 6 बाद 170 धावा जमवित आपला विजय नोंदविला.

आरसीबीच्या डावामध्ये एलीस पेरीची खेळी दमदार झाली. तिने 43 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 81 धावा झोडपल्या. कर्णधार स्मृती मानधनाने 13 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 26 तर रिचा घोषने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा जमविल्या. आरसीबीच्या डावात 4 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. आरसीबीने पहिल्या पॉवरप्लेच्या 6 षटकात 54 धावा जमविताना 3 गडी गमविले. आरसीबीचे अर्धशतक 31 चेंडूत, शतक 76 चेंडूत तर दीडशतक 112 चेंडूत नोंदविले गेले. पेरीने केवळ 30 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. मुंबई इंडियन्सतर्फे अमनज्योत कौरने 22 धावांत 3 तर शबनिम इस्माईल, नॅट सिव्हर ब्रंट, मॅथ्युज आणि संस्कृती गुप्ता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईच्या डावात नॅट सिव्हर ब्रंटने 21 चेंडूत 9 चौकारांसह 42 धावा झोडपल्या तर कर्णधार हरमनप्रित कौरने 38 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 50 धावा जमविल्या. सलामीच्या मॅथ्युजने 10 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा केल्या. मात्र अमनज्योत कौर आणि कमलिनी या जोडीने मुंबई इंडियन्सला थरारक विजय मिळवून देण्यामध्ये मोलाची कामगिरी केली. अमनज्योत कौरने 27 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 34 तर कमलिनीने 8 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 11 धावा केल्या. कमलिनीने विजयी चौकार मारुन आरसीबीवरील विजय साकार केला. आरसीबीतर्फे वेरहॅमने 21 धावांत 3 तर गार्थने 30 धावांत 2 तर बिस्तने 1 गडी बाद केला. मुंबईच्या डावामध्ये 3 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेच्या 6 षटकात 66 धावा जमविताना 2 गडी गमविले. मुंबईचे अर्धशतक 31 चेंडूत, शतक 70 चेंडूत आणि दीडशतक 109 चेंडूत नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक: आरसीबी 20 षटकात 7 बाद 167 (एलीस पेरी 81, रिचा घोष 28, स्मृती मानधना 26, अमनज्योत कौर 3-22, शबनिम इस्माईल, नॅट सिव्हर ब्रंट, मॅथ्युज आणि गुप्ता प्रत्येकी 1 बळी), मुंबई इंडियन्स 19.5 षटकात 6 बाद 170 (हरमनप्रित कौर 50, अमनज्योत कौर 27 चेंडूत नाबाद 34, नॅट सिव्हर ब्रंट 42, मॅथ्युज 15, कमलिनी नाबाद 11, अवांतर 8, वेरहॅम 3-21, गार्थ 2-30, बिस्त 1-37).

Advertisement
Tags :

.