मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते
गुजरात जायंट्स पाच गड्यांनी पराभूत : हेली मॅथ्यूज सामनावीर, नॅट सिव्हर ब्रंटची अष्टपैलू चमक
वृत्तसंस्था/ बडोदा
सामनावीर हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी आणि नॅट सिव्हेर ब्रंटच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मंगळवारी येथे महिलांच्या टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आपल्या विजयाचे खाते उघडताना गुजरात जायंट्सचा 23 चेंडू बाकी ठेऊन 5 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एक सामना गमाविला असून एक सामना जिंकला आहे. तर गुजरात जायंट्सने दोन सामने गमाविले असून एक सामना जिंकला आहे. आरसीबीचा संघ सलग दोन विजयांसह स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीवर आहे. मंगळवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजी दिली. गुजरात जायंट्सचा डाव 20 षटकात 120 धावांत आटोपला. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 16.1 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले.
गुजरात जायंट्सच्या डावामध्ये हरलीन देओलने 31 चेंडूत 4 चौकारांसह 32, काश्वी गौतमने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 20, तनुजा कंवरने 2 चौकारांसह 13, सायली सातघरेने 2 चौकारांसह नाबाद 13, कर्णधार गार्डनरने 1 षटकार आणि 1 चौकारासह 10 धावा केल्या. सलामीची बेथ मुनी, वुलव्हार्ट आणि डी. हेमलता हे तीन फलंदाज लवकर बाद झाले. डॉटीनने 7 धावा केल्या. मुंबई इंडियन्सतर्फे हेली मॅथ्यूज सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरली. तिने 4 षटकात 16 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले. नॅट सिव्हर ब्रंटने 26 धावांत 2, अॅमेलिया केरने 22 धावांत 2 तसेच शबनीम ईस्माईल आणि अमनज्योत कौर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. गुजरात जायंट्सच्या डावामध्ये 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. गुजरात जायंट्सने पॉवरप्लेच्या 6 षटकात 28 धावा जमविताना 4 गडी गमाविले. गुजरातचे अर्धशतक 56 चेंडूत तर शतक 100 चेंडूत फलकावर लागले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी 22 चेंडूत 22 धावांची भागिदारी केली. कंवरने मॅथ्यूजला झेलबाद केले. तिने 19 चेंडूत 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. यास्तिका भाटीया, प्रिया मिश्राच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 1 चौकारासह 8 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रित कौरकडून पुन्हा निराशा झाली. गौतमच्या गोलंदाजीवर ती केवळ 4 धावांवर पायचीत झाली. मुंबईची स्थिती यावेळी 3 बाद 55 अशी होती.
नॅट सिव्हर ब्रंट आणि अॅमेलिया केर या जोडीने चौथ्या गड्यासाठी 45 धावांची भागिदारी केली. अॅमेलिया केरने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा केल्या. गौतमने अॅमेलियाला पायचीत केले. नॅट सिव्हर ब्रंटने 39 चेंडूत 11 चौकारांसह 57 धावा झळकाविल्या. ती 16 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत झाली. मिश्राने तिला बाद केले. ब्रंट बाद झाली त्यावेळी मुंबई इंडियन्सला विजयासाठी केवळ 7 धावांची गरज होती. सजीवन सजना आणि जी. कमलिनी यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. सजनाने 6 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 10 तर कमलिनीने 1 चौकारासह नाबाद 4 धावा केल्या. गुजरात जायंट्सतर्फे प्रिया मिश्रा आणि के. गौतम यांनी प्रत्येकी 2 तर कंवरने 1 गडी बाद केला. मुंबई इंडियन्सच्या डावामध्ये 1 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेच्या 6 षटकात 37 धावा जमविताना 1 गडी गमाविला. मुंबई इंडियन्सचे अर्धशतक 44 चेंडूत तर शतक 83 चेंडूत नोंदविले गेले. नॅट सिव्हर ब्रंटने 33 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स 20 षटकात सर्वबाद 120 (हरलीन देओल 32, के. गौतम 20, तनुजा कंवर 13, सायली सातघरे नाबाद 13, गार्डनर 10, अवांतर 6, नॅट सिव्हर ब्रंट, अॅमेलिया केर प्रत्येकी 2 बळी, मॅथ्यूज 3-16, ईस्माईल आणि अमनज्योत कौर प्रत्येकी 1 बळी), मुंबई इंडियन्स 16.1 षटकात 5 बाद 122 (नॅट सिव्हर ब्रंट 57, मॅथ्यूज 17, भाटीया 8, हरमनप्रित कौर 4, अॅमेलिया केर 19, सजना नाबाद 10, कमलिनी नाबाद 4, अवांतर 3, प्रिया मिश्रा व के. गौतम प्रत्येकी 2 बळी, कंवर 1-25).