मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये
दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान संपुष्टात : आता क्वालिफायर 1 साठी चुरस
वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला. यासह, मुंबईने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे आणि दिल्ली प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 180 धावा केल्या. मुंबईने शेवटच्या 2 षटकांत 48 धावा जोडून ही मोठी धावसंख्या उभारली होती, त्यानंतर दिल्लीचा संघ 121 धावांत ऑलआऊट झाला. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज नंतर मुंबई आता प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. विशेष म्हणजे, क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरमध्ये कोण खेळेल, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माची बॅट पूर्णपणे शांत राहिली. रोहित 5 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर, रायन रिकेल्टन आणि विल जॅक्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ही जोडी 48 धावांवर फुटली. जॅकला 13 चेंडूत 21 धावा करता आल्या. रिकेल्टनही 25 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
सूर्याचा धमाका
सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली आणि 43 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 73 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीदरम्यान, सूर्यकुमारने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार आणि नमन धीर यांनी शेवटच्या दोन षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांना फटकारले आणि एकूण 48 धावा केल्या. शेवटच्या दोन षटकातील या फटकेबाजीमुळे मुंबईने सामन्यात पुनरागमन केले. नमनने 8 चेंडूत 24 धावा करत नाबाद राहिला. याशिवाय तिलक वर्माच्या फलंदाजीतून 27 धावांची महत्त्वाची खेळी आली. या जोरावर मुंबईने 5 विकेट गमावून 180 धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
दिल्लीचा संघ 121 धावांत ऑलआऊट
181 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात पण काही खास झाली नाही. दुसऱ्याच षटकात दीपक चहरने कर्णधार फाफला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फाफच्या बॅटमधून फक्त 6 धावा आल्या. यानंतर, तिसऱ्या षटकात बोल्टने केएल राहुललाही बाद केले. केएलला 11 धावा करता आल्या. त्यानंतर अभिषेक पोरेल देखील चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याला विल जॅक्सने तंबूत पाठवले. यानंतर सँटनरने विपराजला (20) आऊट केले.
दहाव्या षटकात दिल्लीला पाचवा धक्का बसला, जेव्हा स्टब्सला बुमराहने आऊट केले. यानंतर, समीर रिझवी आणि आशुतोष यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण 15 व्या षटकात सँटनरने त्यालाही आऊट केले. समीरने सर्वाधिक 39 धावांचे योगदान दिले. आशुतोष शर्मा 18 धावा काढून बाद झाला. यानंतर दिल्लीच्या इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांचा डाव 18.2 षटकांत 121 धावांत आटोपला. बुमराह व सॅटेनरने प्रत्येकी तीन बळी घेत मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 180 (रिकेल्टन 25, विल जॅक्स 21, सुर्यकुमार यादव 43 चेंडूत 7 चौकार व 4 षटकारासह नाबाद 73, तिलक वर्मा 27, हार्दिक पंड्या 3, नमन धीर 8 चेंडूत नाबाद 24, मुकेश कुमार 2 बळी, कुलदीप यादव, मुस्तफिजूर व चमीरा प्रत्येकी एक बळी)
दिल्ली कॅपिटल्स 18.2 षटकांत सर्वबाद 121 (केएल राहुल 11, समीर रिजवी 39, विपराज निगम 20, आशुतोष शर्मा 18, मिचेल सँटेनर व जसप्रीत बुमराह प्रत्येकी 3 बळी, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा व विल जॅक्स प्रत्येकी एक बळी).
गुणतालिकेत अव्वल कोण?
मुंबईसह गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि आरसीबी हे संघ प्ले ऑफमध्ये खेळणार आहेत. आता पुढे क्वालिफायर 1 मध्ये कोण खेळेल आणि कोण एलिमिनेटरमध्ये यावर सर्वांचे लक्ष आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा विजय खूप महत्त्वाचा होता. मुंबईने टप्प्याटप्प्याने कामगिरी उंचावली आणि अंतिम चारमध्ये जागा पक्की केली. सध्याच्या घडीला गुजरात टायटन्स 18 गुणांसह आघाडीवर आहे, पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी 17 गुण आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही संघांचे आता प्रत्येकी 2 सामने शिल्लक आहेत, तर मुंबईचा एकच सामना बाकी आहे.