For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय

06:46 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय
Advertisement

लखनौ सुपर जायंट्सचा उडवला धुव्वा : सामनावीर विल जॅक्सची अष्टपैलू खेळी : बुमराहचे 4 तर बोल्टचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जसप्रीत बुमराह (4 बळी), ट्रेंट बोल्ट (3 बळी) यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला. यासह मुंबईने सलग पाचवा विजय मिळवताना गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.  प्रथम फलंदाजी करताना मुंबईने रिकेल्टन व सूर्यकुमारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 215 धावा केल्या. यानंतर मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौचा संघ 161 धावांत ऑलआऊट झाला. या विजयासह मुंबईचा नेट रनरेट वाढला असून 12 गुणासह संघ दुसऱ्या स्थानावर आहे. सामन्यात 29 धावा व दोन बळी घेणाऱ्या विल जॅक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. रोहित व रिकेल्टन यांनी 33 धावांची सलामी दिली पण तिसऱ्या षटकातच संघाला मोठा धक्का बसला. रोहित शर्माने दोन षटकार मारून आपला चांगला फॉर्म दाखवला. पण नंतर 5 चेंडूत 12 धावा काढून तो बाद झाला. येथून रायन रिकेल्टनसोबत विल जॅक्सने दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, रिकेल्टनने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर 32 चेंडूत 58 धावा करून आऊट झाला. तिलक वर्मा (6 धावा) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (5 धावा) यांना फारसे काही करता आले नाही.

सूर्याचे अर्धशतक

सूर्यकुमार यादवने मात्र 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. फटकेबाजीच्या प्रयत्नात सूर्या आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. शेवटी, कॉर्बिन बॉशने 10 चेंडूत 20 धावा आणि नमन धीरने 11 चेंडूत नाबाद 25 धावा करत मुंबईला 216 धावापर्यंत मजल मारुन दिली. लखनौ सुपर जायंट्सकडून मयंक यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

लखनौचा संघ ऑलआऊट

मुंबईने दिलेल्या 216 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना लखनौची सुरुवात खराब झाली. मार्करमला फक्त 9 धावा करता आल्या. यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी वेगाने धावा काढल्या. लखनौने पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात 60 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर संघाने आपली लय गमावली आणि नियमित अंतराने विकेट गमावल्या. मिचेल मार्श 24 चेंडूत 34 धावा करून आऊट झाला. 15 चेंडूत 27 धावा काढून निकोलस पूरन पॅव्हेलियनमध्ये परतला.

कर्णधार ऋषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. पंतची बॅट शांत राहिली, तो फक्त 4 धावा करु शकला. आयुष बदोनीने 22 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. डेव्हिड मिलरलाही फार मोठी खेळी साकारता आली नाही. 16 चेंडूत फक्त 24 धावा करता आल्या. अब्दुल समदही स्वस्तात बाद झाला. तो दोन धावा करून बाद झाला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 22 धावा देत 4 विकेट घेतले. ट्रेंट बोल्टने 3 तर विल जॅक्सने 2 विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 7 बाद 215 (रिकेल्टन 58, रोहित शर्मा 12, विल जॅक्स 29, सूर्यकुमार यादव 54, नमन धीर नाबाद 25, मयांक यादव व आवेश खान प्रत्येकी दोन बळी, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी व रवि बिश्नोई प्रत्येकी एक बळी)

लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत सर्वबाद 161 (मिचेल मार्श 34, निकोलस पूरन 27, आयुष बडोनी 35, डेव्हिड मिलर 24, रवि बिश्नोई 13, जसप्रीत बुमराह 4 बळी, ट्रेंट बोल्ट 3 बळी, विल जॅक्स 2 बळी).

मलिंगाला मागे टाकत बुमराहचा घडवला इतिहास

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बुमराहने लखनौविरुद्ध लढतीत तीन बळी घेत मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या तीन बळीसह तो बुमराह आता मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम लसिथ मलिंगाच्या (170 बळी) नावे होता. पण, आता हा विक्रम बुमराहच्या (171 बळी) नावे झाला आहे.

आयपीएलमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

जसप्रीत बुमराह - 174 बळी

लसिथ मलिंगा - 170 बळी

हरभजन सिंग - 127 बळी.

Advertisement
Tags :

.