मुंबई इंडियन्स - दिल्ली कॅपिटल्समध्ये आज अंतिम लढत
वृत्तसंस्था/ मुंबई
महिला प्रीमियर लीगमधील अंतिम सामना आज शनिवारी होणार असून नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत दाखल झालेल्या मुंबई इंडियन्स संघाचे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने पारडे जड दिसत आहे. दुसरीकडे, तर दिल्ली कॅपिटल्सही आपली सरशी होण्याची आशा बाळगून आहे.
सायव्हर-ब्रंट (493 धावा, 9 बळी) आणि मॅथ्यूज (17 बळी आणि 304 धावा) या खेळाडू सध्या अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. मेग लॅनिंगच्या दिल्ली संघाविऊद्ध मुंबईची सरशी होण्याच्या दृष्टीने या दोन खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्त झालेली लॅनिंग ही महिला क्रिकेटमधील महान कर्णधारांपैकी एक आहे. 2008 पासून महिला आणि पुऊष आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला चषक हुलकावणी देत असून हा दुष्काळ संपुष्टात आणण्याचा निश्चय ती करेल.
उत्कृष्ट नेट रन रेटमुळे दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेला असून मुंबईची फलंदाजीतील ताकद त्यांना ब्रेबॉर्न स्टेडियमवर आणखी मजबूत बनवून जाईल. दिल्लीसाठी विजयाची संधी त्यांची फिरकी गोलंदाज जेस जोनासेन आणि अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडे यांच्यावर अवलंबून असेल. त्यांनी लीग टप्प्यात चांगल्या इकोनॉमी रेटने प्रत्येकी 11 बळी घेतले आहे. त्यांच्यातील मागील राउंड रॉबिन सामन्यात दिल्लीने मुंबईला 9 बाद 123 धावांवर मुख्यत्वे शिखा आणि जोनासेन यांच्या प्रयत्नांमुळे रोखले. दिल्लीने हा सामना 9 गडी राखून सहज जिंकला.
सदर सामन्यात मुंबईतर्फे सर्वोत्तम कामगिरी केलेल्या सायव्हर-ब्रंटलाही अपयश आले. हा अपवाद वगळता सायव्हर-ब्रंट नऊ सामन्यांमध्ये 493 धावा आणि पाच अर्धशतके झळकावून प्रभावी फॉर्ममध्ये राहिली आहे. त्यात भर म्हणून तिच्या मध्यमगती गोलंदाजीने नऊ बळी घेतले आहेत आणि मॅथ्यूजचे ऑफब्रेक देखील खूप प्रभावी ठरले आहेत. फलंदाजीस पोषक मैदान असले, तरी त्यावर अमेलिया केरचे लेगब्रेक (16 बळी) देखील निर्णायक ठरू शकतात. ऑफस्पिनर संस्कृती गुप्ता ही तिला पूरक ठरली असून तिने फक्त चार बळी घेतलेले असले, तरी तिचा इकोनॉमी रेट सातपेक्षा कमी आहे.
दिल्लीसाठी शफाली वर्माची (300 धावा) पॉवरप्लेमधील फलंदाजी खूप महत्त्वाची असेल. लॅनिंग (263 धावा) ही सातत्यपूर्ण कामगिरी केलेली दुसरी फलंदाज आहे. भारताच्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार निक्की प्रसादने सुऊवातीला आशादायक कामगिरी केली, पण तिला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. दिल्लीसाठी दोन मोठ्या निराशाजनक बाबी म्हणजे जेमिमा रॉड्रिग्ज आणि मॅरिझेन कॅप यांना आलेले अपयश. पॉवर हिटिंग हा देखील एक महत्त्वाचा पैलू ठरणार असून सहज फटकेबाजी करू शकणाऱ्या खेळाडूंच्या संख्येचा विचार करता त्यात मुंबई दिल्लीपेक्षा निश्चितच पुढे आहे.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.