मुंबईला कोलकाताविरुद्ध आज वानखेडेवर विजयाची आशा
वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन प्रीमियर लीगमध्ये नेहमीप्रमाणे खराब सुरुवात केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ आज सोमवारी त्यांच्या घरच्या मैदानावर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी लढणार असून याप्रसंगी त्यांना जलद पुनरागमनाची आशा असेल. आयपीएल हंगामाची सुऊवात सलग पराभवांनी होणे मुंबई इंडियन्ससाठी नवीन नाही. त्यांनी यावेळी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सविरुद्धचे दोन सामने गमावले आहेत.
स्पर्धेतील सततचे ‘स्लो-स्टार्टर्स’ म्हणून मुंबईला ओळखले जाते. परंतु संघाची गाडी पुन्हा रुळावर येण्यासाठी मुंबईला त्यांच्या गोलंदाजांकडून चांगली कामगिरी आणि फलंदाजांकडून सातत्य यांची गरज भासेल. त्यांच्याकडे खालच्या फळीत तज्ञ फिनिशर नसल्याने ही गरज त्यांना आणखी जास्त प्रकर्षाने भेडसावू लागली आहे. रोहित शर्माची फलंदाजी हेलकावे खाते आहे, तर रायन रिकल्टनला त्याच्या पहिल्या आयपीएल स्पर्धेत भारतीय खेळपपट्ट्यांवर अद्याप त्याची लय सापडलेली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने त्याच्या प्रतिभेची झलक दाखवली असली, तरी तो अद्याप प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही.
दुसरीकडे, रोहित एकदा शून्यावर बाद झालेला आहे, तर एकदा त्याने एकेरी धावसंख्या नोंदविलेली आहे. सूर्यकुमार यादवने गुजरातविऊद्ध 48 धावा केल्या, पण ही खेळी भारतीय टी-20 कर्णधाराच्या नेहमीच्या वैशिष्ट्यांस साजेशी नव्हती. सातत्याने संघात बदल केल्याने मुंबई इंडियन्स आता योग्य संघरचनेच्या शोधात आहे. परंतु सध्याच्या संघात चांगली फटकेबाजी करू शकेल असा तज्ञ फिनिशर नाही. यापूर्वी टिम डेव्हिडसारख्या खेळाडूने ही भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे सूर्यकुमारसह तिलक वर्मावर मुंबईच्या जास्त आशा टिकलेल्या आहेत.
कर्णधार हार्दिक पंड्या वैयक्तिक आघाडीवरील यशाच्या मालिकेनंतर वानखेडे स्टेडियमवर परतताना उत्साहित असेल. गेल्या वर्षी रोहितकडून मुंबईचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याला संतप्त प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागला होता. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सच्या माऱ्याची धार कमी झाली असून नवा चेंडू हाताळणारे डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि रीस टॉपली यांच्यासह दीपक चाहरला वेगवान गोलंदाजीची जबाबदारी पेलावी लागेल.
कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्ध हंगामाच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय मिळविला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरकडे आवश्यक ताकद आहे. परंतु क्विंटन डी कॉकचा सलामीचा जोडीदार म्हणून सुनील नरेनच्या अनुपस्थितीत मोईन अली विसंगत दिसलेला आहे. त्यांच्या फलंदाजीच्या फळीमध्ये रहाणे, वेंकटेश अय्यर आणि अंगक्रिश रघुवंशी यांचा समावेश आहे. रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांच्यासह केकेआरकडे शेवटच्या षटकांत आक्रमणाचे कौशल्य आहे.
त्यांची गोलंदाजीही तितकीच प्रभावी आहे. हर्षित राणा आणि वैभव अरोरा हे ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनसोबत वेगवान माऱ्याची जबाबदारी सांभाळतील. परंतु केकेआरची खरी ताकद त्यांच्या फिरकी माऱ्यात आहे, ज्यामध्ये नरेन आणि वऊण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. चांगल्या खेळपट्टीवरही प्रतिस्पर्धी फलंदाजांना धक्का देण्याची क्षमता असलेला नरेन शनिवारी येथे सराव करताना दिसला. आजारातून ठीक झाल्याचे संकेत त्याने दिलेले असून त्याच्या संभाव्य पुनरागमनामुळे केकेआर उत्साहित असेल. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सवर केकेआरने 24 धावांनी विजयी मिळविला होता. 12 वर्षांतील वानखेडे स्टेडियमवरील तो त्यांचा पहिलाच विजय होता. त्यातून निश्चितच कोलकात्याचा संघ प्रेरणा घेईल.
संघ : मुंबई इंडियन्स-हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, लवनीथ सिसोदिया, वेंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, मोईन अली, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्टजे, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती, चेतन साकरिया.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.