मुंबई-हरियाणा रणजी सामना आजपासून
वृत्तसंस्था/ कोलकाता
मुंबई रणजी संघाने मेघालयला साखळी फेरीत तब्बल 456 धावांनी दणदणीत पराभूत करत रणजी ट्रॉफी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. एलिट ए गटातून मुंबई व जम्मू काश्मिर हे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचले. आता हाच मुंबई संघ एलिट सी ग्रुपचा टॉपर असलेल्या हरियाणा संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. आजपासून उभय संघातील सामना कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय संघाकडून खेळलेले सुर्यकुमार यादव, शिवम दुबे यावेळी मुंबई संघाचा भाग असतील. नागपूरात विदर्भ आणि तामिळनाडू, पुण्यात जम्मू काश्मिर आणि केरळ तसेच राजकोटमध्ये सौराष्ट्र आणि गुजरात यांच्यात या लढती होतील.
42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणारा मुंबई संघ आपल्या 43 व्या विजयासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे हा संघ हरियाणाविरुद्ध लढतीत तगड्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. आजच्या सामन्यात शिवम दुबे आणि सुर्यकुमार यादव हे संघाचा भाग असतील. शिवम दुबे हा नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात सामनावीर ठरला होता तर सुर्यकुमारला मनासारखे प्रदर्शन करता आले नसले तरी तो विजेत्या संघाचा कर्णधार होता.
जम्मू काश्मीरविरुद्ध झालेल्या सहाव्या साखळी सामन्यात मुंबईक़डून यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे खेळले होते. परंतू या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मेघालयविरुद्ध मात्र अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर हेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळताना दिसले, तर शिवम दुबे हा इंग्लंडविरुद्ध टी 20 मालिकेत खेळताना दिसला. आता मात्र टी 20 मालिका संपल्यामुळे व वनडे संघात निवड न झाल्यामुळे सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे मुंबई रणजी संघात परतले आहेत. हरियाणाविरुद्ध विजय मिळवत मुंबईचा उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न असेल.
मुंबईच्या लढतीचे ठिकाण बदलले
बीसीसीआयने अपरिहार्य परिस्थिती‘चे कारण देत शेवटच्या क्षणी मुंबई आणि हरियाणा यांच्यातील रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीचे ठिकाण बदलले आहेत. हरियाणातील लाहलीऐवजी आता कोलकाता येथे हा सामना खेळवला जाणार आहे. बीसीसीआयचे गेम डेव्हलपमेंट मॅनेजर (जीडीएम) अभय कुरुविला यांनी हरियाणा क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांना या बदलाची माहिती दिली आहे. दाट धुके व थंडीमुळे सामन्याचे ठिकाण बदलले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईचा रणजी संघ -
अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकल, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तोमोर (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटियान, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.
नागपूर, पुणे, राजकोट येथेही सामने
नागपूरमध्ये विदर्भ आणि तामिळनाडू यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. विदर्भने या स्पर्धेत प्राथमिक फेरीपर्यंत 7 पैकी 6 सामने निर्णायक जिंकत 40 गुण नोंदविले. ड गटामध्ये तामिळनाडूने गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवित उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. ब गटामध्ये विदर्भने आघाडीचे स्थान मिळविले आहे. विदर्भचे नेतृत्व करुण नायर करत असून तामिळनाडू संघातील एन. जगदीशन, विजय शंकर आणि बाबा इंद्रजित हे प्रमुख खेळाडू आहेत.
पुण्यामध्ये जम्मू काश्मिर आणि केरळ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीत जम्मू काश्मिरने बलाढ्या मुंबईला पराभवचा धक्का दिला असल्याने हा संघ निश्चितच कमकुवत नाही, हे सिद्ध होते. केरळ संघाला या सामन्यात विजयासाठी चांगलेच झगडावे लागेल.
राजकोटमध्ये सौराष्ट्र व गुजरात यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. जयदेव उनादकटकडे सौराष्ट्रचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सौराष्ट्र संघाने गेल्या पाच वर्षांमध्ये दोनवेळा रणजी करंडक जिंकला असून आता त्यांना तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी लाभली आहे. गुजरात संघाकडून या सामन्यात सौराष्ट्रला चांगलाच प्रतिकार अपेक्षित आहे.