मुंबई, गुजरात आज पहिला विजय नोंदविण्याच्या मोहिमेवर
कर्णधार हार्दिक पंड्याच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सला बळकटी, सिराजचा फॉर्म गुजरात टायटन्ससाठी चिंताजनक
वृत्तसंस्था/ .अहमदाबाद
कर्णधार हार्दिक पंड्याचे एका सामन्याच्या बंदीनंतर बहुप्रतिक्षित पुनरागमन आज शनिवारी येथे होणाऱ्या गुजरात टायटन्सविऊद्धच्या सामन्यात होणार असून यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला आवश्यक संतुलन लाभेल. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमधील त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.
मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभवाची दीर्घकाळची परंपरा यावेळीही मोडता आली नाही आणि चेन्नई सुपर किंग्सने चार गडी राखून आरामात विजय मिळवला, तर गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सविरुद्धचा सामना 11 धावांनी गमावला. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जवळजवळ एक आठवड्याचे अंतर मिळालेल्या मुंबईच्या संघाने रिलायन्सच्या जामनगर सुविधेत काही दिवस घालवले. स्पर्धेचे सुऊवातीचे दिवस सुरू आहेत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय मुंबईचा संघर्ष स्पष्ट दिसून आलेला आहे. पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार पंड्याची अनुपस्थिती ही परिस्थिती आणखी बिकट बनविण्यास कारणीभूत ठरली.
पंड्या हा वेगवान गोलंदाजी करणारा असा अष्टपैलू खेळाडू आहे, जो त्याच्या कौशल्याने पूर्णपणे फरक घडवून आणू शकतो. त्याच्या पुनरागमनामुळे रॉबिन मिंझला कदाचित बाहेर बसावे लागेल. चेपॉकच्या खेळपट्टीवर मुंबईची फलंदाजी फारसा आत्मविश्वास निर्माण करू शकली नाही. परंतु आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये फलंदाजीसाठी परिस्थिती खूपच चांगली असेल. येथील पंजाब किंग्स (243 धावा) आणि टायटन्स (232 धावा) यांच्यातील पहिल्या सामन्यात एकत्रितपणे 475 धावा निघाल्या होत्या. फलंदाजीसाठी स्वर्ग असलेल्या खेळपट्टीवर मोहम्मद सिराज कितपत प्रभावी ठरू शकेल हा प्रश्न कायम आहे. त्याने पहिल्या सामन्यात 54 धावा दिल्या.
गुजरातकडे फारसे वरिष्ठ भारतीय वेगवान गोलंदाज नसल्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्यासाठी तो काळजीचा विषय ठरू शकतो. धावा रोखण्याचा आणि गडी बाद करण्याचा दबाव कागिसो रबाडा आणि रशिद खानवर खूपच जास्त आहे. खरे तर दोन्ही संघांच्या सुऊवातीच्या सामन्यांवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की, दोन्ही संघ परदेशी खेळाडूंची परिपूर्ण रचना करू शकलेले नाहीत. मुंबईच्या बाबतीत समस्या आणखी वाढल्या आहेत. कारण भारताचा सध्याचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव गेल्या एका वर्षापासून फॉर्ममध्ये नाही आणि माजी कर्णधार रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म देखील सातत्यपूर्ण नाही. मात्र पंड्याच्या समावेशामुळे फलंदाजीत ताकद वाढली आहे आणि आवश्यकता असल्यास तो गोलंदाजीची सुऊवात देखील करू शकतो. तो शेवटच्या षटकांत वाइड यॉर्कर देखील टाकू शकतो, जे पंजाब किंग्सच्या वैशाख विजयकुमारने प्रभावीपणे केलेले आहे.
मुंबईच्या मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे यष्टिरक्षणाच्या बाबतीत ते रायन रिक्लटनवर खूप अवलंबून आहेत. पहिलाच सामना असला, तरी फलंदाज म्हणून खेळणारा रॉबिन मिंझ हा सूर हरवल्यागत दिसत होता. नवोदित डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरसाठीही ही एक परीक्षा असेल. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तीन बळी घेतले होते. पण मोटेरावर चेंडू चेपॉकइतका वळणार नाही. या तऊण खेळाडूला त्याचा कर्णधार कसा हाताळतो ते पाहावे लागेल. टायटन्ससाठी कर्णधार शुभमन गिलला प्रभावी कामगिरी करून दाखवावी लागेल. वैशाख व रदरफोर्ड यांनी ज्या पद्धतीने मागील सामन्यात एकाच पद्धतीची गोलंदाजी केली ते पाहता त्यांच्या प्रशिक्षकांना आज ग्लेन फिलिप्स हा चांगला पर्याय वाटू शकतो, कारण तो ऑफ स्पिन देखील टाकतो. गोलंदाजीचा विभाग हा गिलसाठी चिंतेचे कारण ठरू शकतो. कारण सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अनुभवी इशांत शर्मा हे एकाच प्रकारचे गोलंदाज आहेत. रबाडा वगळता अन्य कोणत्याही वेगवान गोलंदाजाच्या शस्त्रागारात फारसा फरक नाही.
संघ-गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, शाहऊख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, जयंत यादव, महिपाल लोमरोर, करीम जनात, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, जेराल्ड कोएत्झी, शेरफेन रदरफोर्ड, मानव सुतार, कुमार कुशाग्रा, अर्शद खान, गुरनूर ब्रार, निशांत सिंधू.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकेल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.
सामन्याची वेळ : संध्या. 7.30 वा.