‘एलिमिनेटर’मध्ये आज गुजरातसमोर मुंबईचे आव्हान
वृत्तसंस्था/मुल्लानपूर
विजेतेपदाच्या दृष्टीने पसंती असलेल्या पण गती गमावलेल्या संघांपैकी एक शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सचा सामना आज शुक्रवारी येथे होणाऱ्या आयपीएल एलिमिनेटरमध्ये बलाढ्या मुंबई इंडियन्सशी होईल. मुंबईलाही यावेळी काही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. हा एक नॉकआउट सामना आहे, परंतु दोन्ही संघांना अशा स्तराची सवय आहे. कारण मुंबई इंडियन्स पाच वेळचा विजेता आहे. टायटन्सने गेल्या चार हंगामांत तीन वेळा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे, ज्यामध्ये 2022 मध्ये पदार्पणात चषक जिंकण्याचा समावेश आहे. तथापि, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या या दोघांनाही यावेळी सिद्ध करायचे आहे. जर टायटन्सने सर्वतोपरी प्रयत्न करून बाजी मारली, तर भारताचा नवनियुक्त कसोटी कर्णधार असलेल्या गिलची नेतृत्वक्षमता प्रचंड वाढेल. गेल्या वर्षी मुंबई संघात परतल्यानंतर हार्दिकला चाहत्यांचे प्रेम परत मिळाले आहे आणि आयपीएल चषक जिंकता आल्यास सदर संघाच्या महान खेळाडूंच्या यादीत त्याचे स्थान पक्के होईल. परंतु त्यासाठी दोन्ही कर्णधारांनी त्यांच्या समोरील समस्यांवर उपाय शोधले पाहिजेत.
फलंदाजीच्या आघाडीवर, साई सुदर्शन, गिल आणि जोस बटलरसह वरच्या फळीतील तीन खेळाडूंनी त्यांच्या प्ले-ऑफपर्यंतच्या प्रवासात मोठे योगदान दिले आहे. हे लक्षात घेता लीग टप्प्यानंतर राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठी रवाना झालेल्या बटलरची अनुपस्थिती त्यांना निश्चितच जाणवेल. बटलरच्या जागी कुसल मेंडिसला संधी देण्यात आली आहे, परंतु तो तितक्याच आत्मविश्वासाने खेळू शकतो का हे पाहावे लागेल.
तिलक वर्माकडून फारशा न झालेल्या धावा ही संघासमोरील आणखी एक चिंता आहे. सूर्यकुमार यादवने हंगामात विक्रमी 640 धावा करून फलंदाजी विभागात मोठी कामगिरी केली आहे. जर तो अपयशी ठरला तर मुंबई इंडियन्ससमोर एक मोठे आव्हान निर्माण होईल. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजांच्या धावा काढण्याच्या गतीविषयी प्रश्न उपस्थित केले गेले आहेत आणि हार्दिकला त्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यांचा मजबूत गोलंदाजी विभाग मात्र नेहमीच विरोधी संघांसाठी मोठा धोका राहिलेला आहे.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, रशिद खान, राहुल तेवतिया, शाहऊख खान, निशांत सिंधू, रविश्रीनिवासन साई किशोर, गेराल्ड कोएत्झी, जयंत यादव, अर्शद खान, करीम जनात, शेरफेन रदरफोर्ड, महिपाल लोमरोर, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुतार, गुरनूर ब्रार, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, कुलवंत खेजरोलिया, मोहम्मद सिराज, दासून शनाका, कुसल मेंडिस, जोस बटलर.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, बेव्हन जेकब्स, रॉबिन मिन्झ, कृष्णन श्रीजीथ, नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अश्वनी कुमार, रीस टोपले, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान, रघू शर्मा, जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन, चरिथ असलंका.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.