मेघालयावर डावाने विजय मिळवत मुंबई बाद फेरीत
रणजी ट्रॉफीत 1 डाव व 456 धावांनी दणदणीत विजय : शार्दुल ठरला सामन्याचा हिरो
वृत्तसंस्था/ मुंबई
येथील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीतील मेघालयविरुद्ध सातव्या फेरीचा सामना मुंबईने 1 डाव व 456 धावांनी जिंकला. या विजयासह मुंबईने बोनस गुणासह दणदणीत विजय मिळवत रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे मुंबईचे 29 गुण झाले असून गुणतालिकेत ते अव्वलस्थानी विराजमान आहेत. दुसरीकडे, जम्मू काश्मीर व बडोदा या दोन अव्वल संघांत सामना सुरु असून पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मू संघाला तीन गुण मिळणार आहेत. यामुळे जम्मू संघ पहिल्या तर मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानी राहणार आहे. या सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी शार्दुल ठाकुरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बीकेसीत खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर मेघालय संघ 86 धावांवर ऑलआऊट झाला. मेघालयकडून प्रिंगसांगने 19, आकाश कुमारने 16, अनिश चरकने 17 आणि हिमानने 28 धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने हॅट्ट्रिकसह चार विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मोहित अवस्थीने 3 विकेट घेतल्या. यानंतर मुंबईने पहिल्या डावात 617 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकडून सिद्धेश लाडने 145, आकाश आनंदने 103 आणि शम्स मुलानीने नाबाद 100 धावा केल्या. याशिवाय, भारतीय संघाबाहेर असलेल्या शार्दुल ठाकूरनेही 84 धावांची शानदार खेळी केली. तर अजिंक्य रहाणे 96 धावांवर बाद झाला. या स्टार फलंदाजांच्या धमाकेदार खेळीमुळे मुंबईला तब्बल 585 धावांची आघाडी मिळाली.
मेघालयाला 129 धावांत गुंडाळले
दुसऱ्या डावात खेळताना मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर मेघालयाचा संघ 129 धावांत गारद झाला. मेघालयकडून किशनने सर्वाधिक 39 धावा केल्या. अनिरुद्धने 24, सुमित कुमारने 13, जसकीरतने 15 आणि प्रिंगसांगने 15 धावा केल्या. इतर फलंदाज फ्लॉप ठरल्याने मुंबईने हा सामना 1 डाव व 456 धावांनी जिंकत दणकेबाज विजयाची नोंद केली. मुंबईकडून शार्दुल ठाकूर व तनुष कोटियन या दोघांनी प्रत्येकी चार बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले.
दिल्लीने उडवला रेल्वेचा धुव्वा
आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने तिसऱ्या दिवशीच रेल्वेवर एक डाव आणि 19 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात रेल्वेने प्रथम खेळताना 241 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात दिल्ली संघाने कर्णधार बडोनीच्या 99 धावा आणि सुमित माथूरच्या 86 धावांच्या जोरावर 374 धावा केल्या. संघाला अनुभवी फलंदाज विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो केवळ सहा धावा करून वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानचा बळी ठरला. अशाप्रकारे दिल्लीला पहिल्या डावात 133 धावांची आघाडी मिळाली. रेल्वेचा दुसरा डाव अवघ्या 114 धावांत आटोपला अन् त्यांनी एक डाव आणि 19 धावांनी हा सामना गमावला. दिल्लीकडून दुसऱ्या डावात शिवम शर्माने सर्वाधिक पाच बळी घेतले.