For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये

06:58 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूचा पराभव करत मुंबई फायनलमध्ये
Advertisement

विक्रमी 48 व्यांदा अंतिम फेरीत : तामिळनाडूवर एक डाव व 70 धावांनी दणदणीत विजय 

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

येथील बीकेसी मैदानावर झालेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. मुंबईने उपांत्य फेरीत तामिळनाडूसारख्या बलाढ्या संघाचा एक डाव व 70 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे, या विजयासह स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने विक्रमी 48 व्यांदा अंतिम फेरी गाठली. मोक्याच्या क्षणी शतक व अचूक गोलंदाजी करणाऱ्या शार्दुल ठाकुरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान, रणजी ट्रॉफीचा दुसरा सेमी फायनल सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात सुरु आहे. या सामन्यातील विजेत्या संघासोबत मुंबई 10 मार्चला अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना मुंबईचे होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Advertisement

मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील दुसरा उपांत्य सामना मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात खेळला गेला. शनिवारी तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकून मुंबईविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी पोषक अशा खेळपट्टीवर मुंबईच्या गोलंदाजांनी तामिळनाडूच्या डावाला खिंडार पाडलं. तामिळनाडूचा पहिला डाव अवघ्या 146 धावांवर आटोपला. यानंतर शार्दुल ठाकूरचे शानदार शतक व तनुष कोटियानच्या नाबाद 89 धावा यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 378 धावा केल्या व तब्बल 232 धावांची आघाडी घेतली.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी मुंबईने 9 बाद 353 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. शार्दुल बाद झाल्यानंतर तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी शेवटच्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. तनुष कोटियानने 12 चौकारासह नाबाद 89 धावांचे योगदान दिले. तुषार देशपांडे 3 चौकारासह 26 धावा केल्या. तुषारला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. मुंबईने पहिल्या डावात 106.5 षटकांत 378 धावा केल्या. तामिळनाडूकडून साई किशोरने सर्वाधिक 6 तर कुलदीप सेनने 2 गडी बाद केले.

तामिळनाडूचा 162 धावांत खुर्दा

मुंबईला पहिल्या डावात 232 धावांची आघाडी मिळाल्यानंतर गोलंदाजांनी देखील आपले काम चोख केले. शार्दुल फक्त धडाकेबाज फलंदाजी करून थांबला नाही, तर त्याने गोलंदाजीतही चमक दाखवली. शार्दुलने यावेळी तामिळनाडूच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद करत मुंबईला दुहेरी यश मिळवून दिले. शार्दुलने प्रथम नारायण जगदीशनला बाद केले, त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर शार्दुलने साई सुदर्शनला पाच धावांवर बाद केले. यामुळे पहिल्या पाच षटकांतच तामिळनाडूची 2 बाद 6 अशी अवस्था झाली होती. यानंतर अनुभवी फलंदाज वॉशिंग्टन सुंदरला (4 धावा) मोहित अवस्थीने तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी तामिळनाडूच्या मदतीसाठी बाबा इंद्रजीत धावून आला होता. इंद्रजीतने 9 चौकारासह सर्वाधिक 70 धावांचे योगदान दिले. अवस्थीने त्याला बाद करत तामिळनाडूला मोठा धक्का दिला. यानंतर प्रदोष पॉलने 25, विजय शंकरने 24 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र हजेरी लावण्याचे काम केल्याने तामिळनाडूचा दुसरा डाव 51.5 षटकांत 162 धावांवर संपला. मुंबईने हा सामना एक डाव व 70 धावांनी जिंकत दणदणीत विजयाची नोंद केली. मुंबईकडून शम्स मुलाणीने 53 धावांत सर्वाधिक चार बळी घेण्याची किमया केली. शार्दुल ठाकुर, तनुष कोटियान व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : तामिळनाडू प.डाव 146 व दुसरा डाव 51.5 षटकांत सर्वबाद 162 (बाबा इंद्रजीत 70, विजय शंकर 24, प्रदोष पॉल 25, साई किशोर 21, शम्स मुलाणी 4 तर शार्दुल, तनुष व तुषार प्रत्येकी दोन बळी).

मुंबई पहिला डाव सर्वबाद 378.

मुंबई विक्रमी 48 व्यांदा अंतिम फेरीत

रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने 48 व्यांदा अंतिम फेरी गाठली. यापूर्वी मुंबई 41 वेळा चॅम्पियन आणि सहा वेळा उपविजेता ठरली  आहे. याआधी मुंबईने 2016 मध्ये अखेरचे विजेतेपद पटकावले होते. मुंबईचा अंतिम सामना विदर्भ व मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्यांशी होणार आहे. अर्थात, हा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याने मुंबईला जेतेपदाची नामी संधी असणार आहे.

शार्दुल ठाकुर विजयाचा हिरो

सामन्यात अष्टपैलू खेळी साकारणारा शार्दुल ठाकुर मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. या सामन्याच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकुरने शानदार शतक झळकावले. पहिल्या डावात मुंबई संघाने अवघ्या 106 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर 9 व्या क्रमांकावर येऊन शार्दुलने 109 धावांची खेळी केली. शार्दुलने 105 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकार आले. विशेष म्हणजे शार्दुल ठाकुरच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे पहिलेच शतक होते. याशिवाय या सामन्यात त्याने 4 विकेट्सही आपल्या नावावर केल्या.

विदर्भाकडे 261 धावांची आघाडी

नागपूर : रणजी करंडक स्पर्धेच्या मध्य प्रदेशविरुद्ध उपांत्य सामन्यात विदर्भ संघाने 261 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा पहिला डाव 170 धावांवर आटोपला. यानंतर मध्य प्रदेशने हिमांशु मंत्रीच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 252 धावा केल्या व 82 धावांची आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात विदर्भाने दुसऱ्या दिवसअखेरीस 1 बाद 13 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण, पहिल्या सत्रात अक्षर वाखरेला अनुभव अगरवालने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर ध्रुव शोरेने 40 धावांचे योगदान दिले. ध्रुव बाद झाल्यानंतर अनुभवी अमन मोखडेने 59 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. करुण नायर 38 धावा करुन बाद झाला. यावेळी विदर्भाची 5 बाद 161 अशी स्थिती होती. मोक्याच्या क्षणी यश राठोड व अक्षय वाडकर यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 158 धावांची भागीदारी साकारली. राठोडने 12 चौकारासह नाबाद 97 धावा केल्या तर वाडकरने 77 धावांचे योगदान दिले. वाडकर बाद झाल्यानंतर राठोड व आदित्य सरवटे यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने 90 षटकांत 6 बाद 343 धावा केल्या होत्या. यश राठोड 97 व सरवटे 14 धावांवर नाबाद होते.

संक्षिप्त धावफलक : विदर्भ प.डाव 170 व दुसरा डाव 90 षटकांत 6 बाद 343 (यश राठोड खेळत आहे 97, अमन मोखडे 59, करुण नायर 38, अक्षय वाडकर 77, अनुभव अगरवाल व कुमार कार्तिकेय प्रत्येकी दोन बळी).

Advertisement
Tags :

.