मुंबईने तामिळनाडूला 146 धावांवर गुंडाळले
रणजी चषक सेमीफायनल : तुषार देशपांडेचे 3 बळी : दिवसअखेरीस मुंबईच्या 2 बाद 45 धावा
वृत्तसंस्था/ मुंबई
रणजी ट्रॉफी हंगामाचा पहिला उपांत्य सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला जात आहे, तर दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळवला जात आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने विदर्भाला पहिल्या डावात अवघ्या 170 धावांत गुंडाळले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईविरुद्ध तामिळनाडूची फलंदाजी पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरली. संपूर्ण संघ 146 धावांवर गारद झाला. दिवसअखेरीस मुंबईने 2 बाद 45 धावा केल्या असून अद्याप ते 101 धावांनी पिछाडीवर आहेत.
मुंबईतील बीकेसी मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार साई किशोरचा हा निर्णय चांगलाच चुकीचा ठरला. डावातील पहिल्याच षटकात चौथ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरने सलामीवीर साई सुदर्शनला बाद केले. सुदर्शनला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर नारायण जगदीशन (4), प्रदोष पॉल (8) व कर्णधार साई किशोर (1), बाबा इंद्रजीत (11) हे स्टार फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्याने तामिळनाडूची 5 बाद 42 अशी स्थिती झाली होती. अनुभवी फलंदाज विजय सुंदरने सर्वाधिक 8 चौकारासह 44 धावांचे योगदान दिले तर वॉशिंग्टन सुंदरने 5 चौकारासह 43 धावा केल्या. तळाचा फलंदाज मोहम्मदने 17 तर अजित रामने 15 धावा फटकावल्या. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्याने तामिळनाडूचा पहिला डाव 64.1 षटकांत 146 धावांवर संपला. मुंबईकडून तुषार देशपांडेने पहिल्या डावात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर शार्दुल ठाकूर, मुशीर खान आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहित अवस्थीला एक विकेट मिळाली.
मुंबईची खराब सुरुवात
तामिळनाडूच्या 146 धावांना प्रत्युत्तर देताना मुंबई संघ 101 धावांनी पिछाडीवर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 17 षटकात 2 बाद 45 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ (5) आणि भूपेन ललवाणी (15) हे स्वस्तात बाद झाले. मुशीर खान (24) मोहित अवस्थी (1) नाबाद आहेत. तामिळानाडूकडून कुलदीप सेन आणि साई किशोरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : तामिळनाडू पहिला डाव सर्वबाद 146 (विजय सुंदर 44, वॉशिंग्टन सुंदर 43, मोहम्मद 17, तुषार देशपांडे 24 धावांत 3 बळी, मुशीर, शार्दुल व तनुष प्रत्येकी दोन बळी).
मुंबई पहिला डाव 17 षटकांत 2 बाद 45 (पृथ्वी शॉ 5, ललवाणी 15, मुशीर खान खेळत आहे 24, अवस्थी खेळत आहे 1, कुलदीप सेन व साई किशोर प्रत्येकी एक बळी).
विदर्भाच्या पहिल्या डावात 170 धावा, आवेश खानचे 4 बळी
नागपूर : येथील विदर्भ क्रिकेट असोशिएनच्या मैदानावर रणजी चषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशच्या भेदक माऱ्यासमोर विदर्भाचा पहिला डाव 170 धावांवर आटोपला. विदर्भाकडून करुण नायरने सर्वाधिक 63 धावांची खेळी साकारली, तर अथर्व तायडेने 39 धावांचे योगदान दिले. ध्रुव शौरेने 13 धावांची खेळी केली. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. मध्य प्रदेशकडून आवेश खानने अप्रतिम गोलंदाजी करताना सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच कुलवंत खजरोलिया आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. यानंतर खेळताना मध्य प्रदेशने पहिल्या दिवसअखेरीस 20 षटकांत 1 बाद 47 धावा केल्या आहेत. सलामीवीर यश दुबे 11 धावा काढून बाद झाला. दिवसअखेरीस हिमांशु मंत्री 26 तर हर्ष गवळी 10 धावांवर खेळत होते. मध्य प्रदेशचा संघ अद्याप 123 धावांनी पिछाडीवर आहेत.