For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईने उडवला ओडिसाचा धुव्वा

06:51 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबईने उडवला ओडिसाचा धुव्वा
Advertisement

1 डाव व 103 धावांनी चारली धूळ : सामनावीर शम्स मुलानीचे 11 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

मुंबईने ओडिसाविरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मुंबईने हा सामना 1 डाव व 103 धावांनी जिंकत बोनस गुणाची कमाई केली. मुंबईने पहिला डाव 4 बाद 602 धावांवर घोषित केला. यानंतर  ओडिसाचा पहिला डाव 285 तर दुसरा डाव 214 धावांवर गुंडाळला. ज्यात फिरकीपटू शम्स मुलानीने मुंबईच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. मुलानीने सामन्यात 11 बळी घेतले, या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

या सामन्यात ओडिसाने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते. या संधीचा मुंबईने पुरेपूर फायदा घेतला. श्रेयस अय्यरचे द्विशतक व सिद्धेश लाडची शानदार दीडशतकी खेळी या जोरावर मुंबईने पहिला डाव 4 बाद 602 धावांवर घोषित केला. श्रेयस व सिद्धेश या दोघांनी चौथ्या गड्यासाठी विक्रमी 354 धावांची भागीदारी केली. याशिवाय, अंगीकृष रघुवंशीने 92 तर सुर्यांश शेडगेने नाबाद 79 धावांचे योगदान दिले.

ओडिसाचा संघ दोन्ही डावात मुलानीसमोर ढेर

ओडिसाचा संघ  पहिल्या डावात 94.3 ओव्हरमध्ये 285 धावांवर ऑलआऊट झाला. ओडीशाकडून संदीप पटनाईकने 102 धावांची खेळी केली. मात्र त्याला दुस्रया बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. ओडीशाचे टॉप 5 मधील 3 फलंदाज हे झिरोवर आऊट झाले. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. मुंबईकडून शम्स मुलानीने 6 विकेट्स घेतल्या. यानंतर दुसऱ्या डावातही ओडिसाच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले. शम्स मुलानी व हिमांशु सिंग यांच्या फिरकीसमोर ओडिसाचा दुसरा डाव 72.5 षटकांत 214 धावांत आटोपला. आशिर्वाद स्वानने सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. कार्तिक बिस्वाल 45 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय संदीप पटनाईकने 39 धावा केल्या. याव्यतिरिक्त ओडिसाचे इतर फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. मुंबईकडून दुसऱ्या डावात शम्सने 5 आणि हिमांशु सिंह याने 4 विकेट्स मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक

मुंबई पहिला डाव 4 बाद 602 घोषित

ओडिसा प.डाव 285 व दुसरा डाव 72.5 षटकांत सर्वबाद 214 (आशिर्वाद स्वान 51, पटनाईक 39, समंत्रय 26, कार्तिक बिस्वाल नाबाद 45, प्रधान 18, शम्स मुलानी 5 तर हिमांशु सिंग 4 बळी).

मुंबईच्या विजयात शम्स मुलानी चमकला

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या सामन्यात शम्स मुलानी व हिमांशु सिंग यांच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने हा सामना सहज जिंकला. मुलानीने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले. तसेच हिमांशु सिंगनेही सामन्यात एकूण 7 बळी चमक दाखवली.

होमग्राऊंडवर महाराष्ट्राचा संघ सेनादलाकडून पराभूत

पुणे : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सेनादलाने महाराष्ट्राला 35 धावांनी पराभूत केले. घरच्या मैदानावर खेळताना महाराष्ट्राला या सामन्यात सपशेल हार पत्कारावी लागली. प्रथम फलंदाजी करताना सेनादलाने 293 धावा केल्या, यानंतर महाराष्ट्राचा पहिला डाव 185 धावांत आटोपला. पहिल्या डावात 108 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवताना सेनादलाने दुसऱ्या डावात 230 धावा केल्या व महाराष्ट्रासमोर विजयासाठी 338 धावांचे टार्गेट ठेवले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा संघ 303 धावांत ऑलआऊट झाला. महाराष्ट्राचा चार सामन्यातील दुसरा पराभव ठरला.

इतर रणजी सामन्यांचे निकाल

मेघालय वि जम्मू व काश्मीर 7 गड्यांनी विजयी

बडोदा वि त्रिपुरा, सामना अनिर्णीत

पश्चिम बंगाल वि कर्नाटक, सामना अनिर्णीत

मिझोराम वि गोवा, गोवा 1 डाव व 169 धावांनी विजयी.

Advertisement
Tags :

.